म्हावशी येथील शेतकऱ्यांनी शिव नावाच्या शिवारात जनावरांसाठी कटीचे पेडे, हायब्रीडचा कडबा तसेच भाताचे काड काढून गंजी लावून प्रत्येकाने आपापल्या शेतात ठेवल्या होत्या. रविवारी दुपारच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने शेत पेटवल्याने वणवा पेटला. बघता बघता शिव नावाचे संपूर्ण शिवार आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीत चार मैलांपर्यंतचा शिवार व डोंगर जळून गवत, तुरीची झाडे, जळाऊ लाकूड, चिकूची, आंब्याची झाडे जळून गेली आहेत. या आगीत गोरख काशिनाथ घाडगे, विलास बाबूराव घाडगे, जालिंदर विठ्ठल घाडगे, अरविंद बंडू घाडगे, तानाजी किसन घाडगे, सहदेव दगडू घाडगे, महादेव दगडू घाडगे, सीताराम बंडू घाडगे, काशिनाथ विठ्ठल शिंदे, आनंदा विठ्ठल घाडगे, संपत महिपती घाडगे, दीपक नथुराम घाडगे, बाळासाहेब विश्वनाथ घाडगे अशा एकूण तेरा शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.
फोटो : ०२केआरडी०२
कॅप्शन : म्हावशी, ता. पाटण येथे वणव्यात फळझाडांसह चाऱ्याच्या गंजी जळून खाक झाल्या.