पेट्री : सातारा-कास मार्गावरील पर्यटकांना नेहमीच मोहित करणारा, पावसाळयात खळाळून वाहणारा धबधबा पाईपात गुंडाळला गेला आहे. पाईपच्या माध्यमातून ते पाणी टाकीत साठवून पूल बांधण्यासाठी वापरले जात आहे. परंतु, छोटा धबधबा बंद झाल्याने पर्यटकांना सेल्फी, फोटोसेशनला मुकावे लागत आहे. पर्यटकांचे तेथे थांबणेही कमी झाल्याने खाऊ कमी झाल्याने वानरसेना गायब झाली आहे.जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कास, बामणोलीला जाण्यासाठी पर्यटकांना यवतेश्वर घाटातून प्रवास करावा लागतो.
कास, बामणोली पर्यटनस्थळी जिल्हा, परजिल्ह्यातुन पर्यटकांची वर्षभर वर्दळ असते. शनिवार, रविवारी सुटीच्या दिवशी पर्यटकांची गर्दी वाढते. वाहनचालक, नोकरदार, शाळा-महाविद्यालयीन तरूणाई, शाळकरी मुलांची सतत वर्दळ असते.यवतेश्वर घाटात ठिकठिकाणी लहान मोठे धबधबे तयार झाले आहेत. पाणी वाहण्याचे प्रमाण कमी कमी होत जात उन्हाळ्यात अत्यल्प म्हणजेच थेंबथेंब पाणी पडताना दिसते. तेथे प्रवासी हमखास थांबून काही वेळ आराम करतात.सांबरवाडी हद्दीत धबधब्यापासून काही अंतरावर झरा आहे. या झऱ्याचे पाणी हौदात आले आहे.
हौदातील पाणी ओव्हरफ्लो झाले की तुटलेल्या पाईपलाईन मधून पाणी यवतेश्वर घाटातील या कडेकपारीतून वाहू लागते. हिवाळ्यानंतर पाणी कमी-कमी होत जाते. सद्या झऱ्यातून बऱ्यापैकी पाणी वाहत असते. तेथे पर्यटक थांबत असल्याने समोरच दगडावर, संरक्षक कठड्यावर वानरे ओळीत बसलेली असतात. पर्यटकही त्यांना खाऊ देतात.
या मार्गावर दीड महिन्यापूर्वी खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. झऱ्यातून वाया जाणारे पाणी बांधकामासाठी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहे.
थेट तुटलेल्या लोखंडी पाईपलाईनला पाईप लावून टँकरद्वारे बांधकामासाठी पाणी वापरणे सोईचे झाले आहे. परंतु झरा अथवा धबधबा पाईपातच गुंडाळला गेल्याने पर्यटकांचे फोटोसेशनसाठी थांबण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे वानरसेनेला खाद्य पदार्थ मिळणेही कमी झाले आहे.