सातारा : भटक्या श्वानांप्रमाणे भूतदया दाखवून गवा, मोर, वानर आदी वन्यप्राण्यांना खाऊ घालण्याच्या प्रकारामुळे नैसर्गिक अन्नसाखळी बिघडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयतं मिळत असल्यामुळे नैसर्गिक पद्धतीने अन्न शोधण्याची कला हे प्राणी विसरू लागल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
गत सप्ताहात महाबळेश्वरच्या रांजणवाडी येथील इब्राहिम महंमद पटेल गव्याला पाव खाऊ घालत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. वन्यजीव अधिनियमानुसार या प्रकरणी त्यांना नोटीस बजावल्यानंतर वन्यप्राण्यांना खाऊ घालणं हा गुन्हा असल्याचं स्पष्ट झालं. गव्यासह वानर, मोर, चिमणी यांनाही खाऊ घालणं हा वन्यजीव अधिनियमानुसार गुन्हा आहे. या प्रकारे वन्यजीवांना खाऊ घालणारे सर्वच लोक वनविभागाच्या रडारवर आहेत.
वन्यक्षेत्राच्या लगत असणाऱ्या शहरी भागांमध्ये भूतदयेच्या नावाखाली प्राण्यांना खाऊ घालणं, त्यांच्यासाठी पाणी ठेवणं, त्यांना तयार घरटी तयार करून देण्याचं अनोखं फॅड सध्या बाजारात विक्रीसाठी सज्ज आहे. निसर्गाने प्रत्येकाच्या अन्नाची सोय त्यांच्या अधिवासात केली आहे. मानवाने त्यांना आयतं अन्न उपलब्ध करून दिल्याने त्याचा विपरीत परिणाम पहायला मिळू लागला आहे.
चौकट :
मंदिरांमध्ये वानरांकडून संरक्षणाची येतेय वेळ!
आपल्याकडील अनेक देवस्थाने डोंगरात आहेत. येथे मोठ्या प्रमाणावर वानरांचे वास्तव्य असते. प्रारंभी माणसांची चाहूल लागली की दूर पळणारी वानरं आता माणसांच्या हातातील पिशवी बघून त्यांच्या पाठीमागे लागत आहेत. अन्न मिळविण्याच्या उद्देशाने वानरांनी मानवाला जखमी केल्याचे प्रकारही घडले आहेत. जंगलात मिळणाऱ्या खाद्यावर जगणारे वानर आता मानवासारखं आइस्क्रीम, वेफर्स, गोळा आदी पदार्थ खाऊ लागले आहेत.
कोट :
नैसर्गिक अधिवासात राहणाऱ्या वन्यजीवांच्या खाण्याची सोय निसर्गाने केली आहे. त्यामुळे मानवाने त्यांना खायला घालण्याची आवश्यकता नाही. हे प्रकार केल्यामुळे मानव आणि वन्यजीव संघर्षाला आमंत्रण मिळते. अन्न शोधण्याच्या नैसर्गिक सवयींही पुढच्या पिढ्यांमध्ये लुप्त होत आहेत.
- सुनील भोईटे, पर्यावरण तज्ज्ञ, सातारा
चौकट :
वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२मध्ये कलम ९ अंतर्गत वन्यप्राण्यांना खायला घालणं म्हणजे शिकारीच्या उद्देशाने त्यांना आमिष दाखवणं असं गृहीत धरलं गेलं आहे. हे शिकारी इतकंच गंभीर असल्याने मोर आणि गवा यांना खाद्य देणाऱ्यांना ३ ते ७ वर्षांपर्यंतची तर वानराला खाऊ घालणाऱ्यांना तीन वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे.
- सचिन डोंबाळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, भरारी पथक, सातारा
अन्न शोधण्याची नैसर्गिक सवयही हद्दपार!
अन्नसाखळीत जिवाबरोबरच त्याचा अधिवास आणि त्यातही त्याच्या खाण्याची व्यवस्था निसर्गाने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी जो वन्यजीव आढळतो त्याच्या खाद्याची उपलब्धता तिथेच केलेली असते. वाढता मानवी हस्तक्षेपामुळे वन्यप्राण्यांचे अधिवास धोक्यात आले. याचे पापक्षालन म्हणून मुक्या प्राण्यांना खाऊ घालण्याचं फॅड वाढलं. परिणामी नैसर्गिक पद्धतीने अन्न शोधण्याची वन्यजीवांची सवय लुप्त होऊ लागली आहे. हे त्यांच्या अखंड प्रजातीसाठी आणि पर्यायाने निसर्ग साखळीला धोक्याचं आहे.