सातारा : एरव्ही नियमांचे उल्लंघन केल्यानंतर वाहनचालकांना दंडाची पावती देणारे हात जेव्हा मदतीचा हात देतात, तेव्हा त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडते. असाच काहीसा प्रकार घडला. पूरपरिस्थितीमुळे महामार्गावर अडकून पडलेल्या वाहनचालकांना फूड पॅकेट देऊन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने ट्रकचालकांना दिलासा दिला. अनपेक्षितपणे मिळालेली ही मदत पाहून ट्रकचालक भारावून गेले.
कोल्हापूर येथील पूरपरिस्थितीमुळे पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. पुण्याहून कोल्हापूरला जाणारी अवजड वाहने, ट्रक, कंटेनर हे आनेवाडी टोलनाक्यावर थांबविण्यात आले आहेत. अचानक या सर्व वाहनचालकांची गैरसोय झाल्यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी सहाशे वाहनचालकांची तीन दिवसांच्या नाष्ट्याची सोय केली. शनिवारी सकाळी विनोद चव्हाण हे स्वत: सर्व अधिकाऱ्यांना घेऊन आनेवाडी टोलनाक्यावर गेले. खाकीतील गणवेशधारी अधिकाऱ्यांनी ट्रकचालकांना एकत्र बोलावून फूड पॅकेट दिले. इतर नागरिकांबरोबरच अधिकाऱ्यांनीही वाहनचालकांना आपल्यापरीने मदत केली. महामार्गावर अडकलेले ट्रकचालक हे उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानमधील असल्याचे समोर आले आहे.
फोटो ओळ : आनेवाडी (ता. जावळी) येथील टोलनाक्यावर शनिवारी पूरपरिस्थितीमुळे अडकलेल्या ट्रकचालकांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी फूड पॅकेटचे वाटप केले.
फोटो : २४ दत्ता यादव