नितीन काळेल सातारा : कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर कामानिमित्त आलेले अनेकजण साताऱ्यात अडकलेत. तसेच बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनाही खोलीतच बसावे लागले आहे. मात्र, या सर्वांपुढे पोटाचा प्रश्न असून, सध्या विविध संस्थांकडून मिळणाऱ्या अन्न पाकिटावरच त्यांची गुजराण सुरू आहे. २५ दिवसांपासून त्यांना भाकरी, चपती व भाजीही मिळाली नसल्याचे वास्तव आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मार्च महिन्यापासून विविध उपाययोजना राबविल्या आहेत. त्यानंतर केंद्र शासनाने लॉकडाऊनच जाहीर केला. संपूर्ण देशात संचारबंदी आहे. आता लॉकडाऊनचा दुसरा भाग सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात प्रशासनाने काही नियम घालून दिले आहेत. त्यानुसारच काम सुरू आहे. पण, याचा फटका साताऱ्यात कामासाठी आलेल्या अनेकांना बसलाय. तसेच बाहेरच्या शहरातील विद्यार्थ्यांनाही याची चांगलीच झळ बसली आहे.पहिला लॉकडाऊन जाहीर व्हायच्या अगोदर साताऱ्यात काहीजण कामानिमित्त आले होते. लॉकडाऊननंतर त्यांना घरी जाणे जमलेच नाही. अशामधील अनेकजण हे लॉजिंगमध्ये अडकून पडले आहेत. यामधील एकजण आहेत संदीप पिसाळ. मुंबईतील रहिवासी असणारे पिसाळ हे डेंटल चेअरचे सर्व्हिसिंग, मेंटेनन्सचे काम करतात. त्यासाठी पिसाळ हे मार्च महिन्यात साताऱ्यात आले होते. लॉकडाऊन झाल्यानंतर त्यांना साताऱ्याच्या बाहेर पडताच आले नाही.
सध्या त्यांचे येथील एका लॉजिंगमध्ये वास्तव्य आहे. कंपनीच्यावतीने त्यांना सोयी सुविधा मिळत असल्यातरी जेवणाचा प्रश्न आहे. हॉटेल्स सुरू नसल्याने जेवणच मिळत नाही. सध्या साताऱ्यातील काही संस्था त्यांना दोनवेळ अन्नाचे पाकीट देत आहेत. त्यामध्ये भात, दालच्या यांचा समावेश असतो. पण, एवढ्यावर भूक भागणे तसे अवघडच आहे.
विकत घ्यायचे झाले तर काहीच मिळत नाही. त्यामुळे भाजी-भाकरी आणि चपाती त्यांच्यापासून २५ दिवस झाले दूरच आहे. अशीच स्थिती पिसाळ यांच्याबरोबर अडकलेल्या अनेक जणांची आहे. यामध्ये कोणी वृद्ध आहेत. पण, त्यांनाही लॉकडाऊनमुळे लॉजबाहेर पडणे अवघड झाले आहे. पोटाचा प्रश्न असल्याने त्यांनाही अन्न पाकिटांचाच आधार आहे.साताऱ्यातील एका कॉलेजमध्ये काही तरुणी कोर्स करतात. त्यातील एकजण रायगड जिल्ह्यातील तर दुसरी मुंबईची आहे. गेल्या २५ दिवसांपासून दोघीही रुममध्येच अडकून पडल्यात. त्यांची मेसही बंद झालीय. त्यातच रुममध्ये काही बनवायचे म्हटले तर तशी सोयही नाही. त्यामुळे त्यांनाही एका संस्थेकडून घरपोच अन्न पाकीट मिळत आहे.
या दोघींनाही पोटाची भूक मारूनच राहावे लागत आहे. जवळ पैसे असलेतरी काहीच खरेदी करता येत नाही, अशीही त्यांची स्थिती आहे. अशाप्रकारे अनेक विद्यार्थीही साताऱ्यात अडकून पडलेत. ज्यांच्यापुढे जेवणाचा प्रश्न मोठाआहे.घरी मोबाईलवरूनच संपर्क...साताऱ्यात अडकलेल्यांना आपल्या गावी जाता येत नाही. पोटाची आबाळ सुरूच आहे. पण, पर्याय नसल्याने त्यांना आहे तेथेच थांबावं लागतंय. त्यातच जवळ पैसे असूनही उपयोग होत नाही. दिवसभर एकमेकांशी गप्पा मारायच्या. अन्न पाकिटे आले की खायचे एवढेच त्यांच्या हाती आहे. तर सायंकाळच्या सुमारास मोबाईलवरून घरच्यांशी संपर्क साधला जातो. कधी-कधी व्हिडीओ कॉल केला जातो. लॉकडाऊन संपत नाही तोपर्यंत या सर्वांना साताºयातच थांबावे लागणार असल्याने त्यांनी मनाची तशी तयारीही केली आहे.