लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी जाहीर केली असली, तरी साताऱ्यातील बहुतांश नागरिक व वाहनधारकांना याचे कसलेच गांभीर्य नाही. प्रमुख रस्ते व चौकात पोलिसांकडून सुरू असलेली कारवाई टाळण्यासाठी शुक्रवारी वाहनधारक चक्क गल्लीबोळातून प्रवास करताना दिसून आले, तर दुसरीकडे भाजी मंडईत नेहमीप्रमाणेच गर्दी दिसून आली.
राज्य शासनाने कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी दि.१५ ते ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लागू केले आहेत. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय, उद्योग बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात गुरुवार, दि.१५ पासून या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. मात्र, नागरिकांचा संचारबंदीला म्हणावा असा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी साताऱ्याची बाजारपेठ गजबजून गेली होती. हजारो वाहनधारक रस्त्यावरून फेरफटका मारताना दिसून आले. किराणा दुकानाच्या बाहेर रांगा लागल्या होत्या. भाजी मंडईही गर्दीने तुडुंब भरली होती. कुठेही फिजिकल डिस्टन्सचे पालन झाले नाही. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी देखील बाजारपेठेत गर्दी दिसून आली. मात्र, यामध्ये वाहनधारकांची संख्या लक्षणीय होती.
शहरात विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. शहरातील प्रमुख चौक व रस्त्यांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या कारवाईपासून वाचण्यासाठी अनेक वाहनधारकांनी क्लृप्त्या लढविल्या. प्रमुख रस्त्यावरून ये-जा करण्याऐवजी अनेकांना गल्लीबोळातून प्रवास करणे सोयीचे वाटले. एकीकडे प्रशासन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जीवतोड मेहनत घेत आहे. पोलीस प्रशासन अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहे. मात्र, वाहनधारक व नागरिकांचे प्रशासनाला म्हणावे असे सहकार्य मिळत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढू लागली आहे.
(पॉइंटर)
१. संचारबंदीची रिक्षाचालकांना सर्वात मोठी झळ बसत आहे. प्रवासी नसल्याने रिक्षाचालकांना दिवसभर ग्राहकांची वाट पाहत बसावे लागत आहे.
२. एसटीसेवेचीही काहीशी अशीच अवस्था आहे. प्रवाशांअभावी एसटीच्या अनेक फेऱ्या दोन दिवसांपासून रद्द करण्यात आल्या आहेत.
३. शहरातील दुकाने सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अनेक दुकानदार रात्री उशिरापर्यंत अर्धे शटर खाली करून दुकान सुरू ठेवत आहेत.
४. शेतकऱ्यांच्या कृषी मालाचा उठाव होत नसल्याने शेतकऱ्यांकडून विविध प्रकारच्या फळे व पालेभाज्यांची चढ्या दराने विक्री केली जात आहे.
५. विविध वस्तूंच्या किमती वाढल्याने याचा ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे.
फोटो : जावेद खान