कोरेगाव : जरंडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पाडळी, जळगाव, भाकरवाडी व ल्हासुर्णे परिसरात गेल्या दोन दिवसांपासून रानगव्यांचे दर्शन होत आहे. यामुळे शेतमजूर शेतीचे काम करण्यासाठी शेतात जाण्यास धजावत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
कायम दुष्काळी हे बिरुद अंगावर घेऊन अनेक वर्षे पाणीटंचाईशी सामना करणार्या कोरेगाव तालुक्यात जलसंधारणाचे काम मोठ्या प्रमाणावर झाले आहे. डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या गावांमध्ये जलसंधारणामुळे पाण्याचे मोठे साठे तयार झाले असून, हिरवळदेखील वाढली आहे. तालुका टँकरमुक्त झाला असून, वनक्षेत्रामध्ये वृक्षारोपण झाल्याने वनक्षेत्रातही वाढ झाली आहे.
एरव्ही पाचगणी-महाबळेश्वरच्या पट्ट्यात दिसणारे रानगवे आता कोरेगाव तालुक्यात दर्शन देऊ लागल्याने भीतीचे वातावरण आहे. ल्हासुर्णेमध्ये शनिवारी रात्री रानगव्यांचा कळप फिरत होता, सोमवारी सकाळी जळगावमध्ये जरंडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी हा कळप दिसला. रानगव्यांचा कळप फिरत असल्याची बातमी समजताच, अनेकांनी शेताकडे न जाण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी जर जात नसतील, तर आम्ही कसे जाणार, असा प्रश्न शेतमजूर विचारत आहेत.
(चौकट)
वन विभागाने वाढवली गस्त
अन्नाच्या शोधार्थ हे रानगवे तालुक्यात आल्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केली. शेतकर्यांच्या याविषयी तक्रारी आल्या असून, वन विभागाने गस्त वाढवल्याचे सांगण्यात आले.
फोटो : १२ कोरेगाव फोटो
जळगाव (ता. कोरेगाव) येथे जरंडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी रानगव्यांचा कळप नजरेस पडत आहे.