पाटण : धनगर एकजुटीचा विजय असो, यळकोट यळकोट जय मल्हारपेठ, एसटी आरक्षण मिळालंच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्कांचं नाही कुणाच्या बापाचं, आरं कोण म्हणतंय देत न्हाय घेतल्याशिवाय राहत न्हाय, अशा घोषणा देत पाटण तालुका धनगर समाज बांधवांनी बाजाराच्या दिवशी सोमवारी कऱ्हाड-चिपळूण राज्यमार्गावर ठिय्या मांडत रास्ता रोको केला. यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही वेळानंतर पाटण पोलिसांनी स्वत: आंदोलनकर्त्यांना रस्त्यावरून बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.दरम्यान, पाटण तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात धनगर समाज वास्तव्यास आहे. या समाजातील मुले आता कुठे शिक्षण घेऊ लागली आहेत. त्यामुळे त्यांना इतर समाजाप्रमाणे आरक्षण, शिष्यवृत्ती बरोबर विविध योजना, सोयीसुविधांचा लाभ मिळाला पाहिजे. आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचण्यासाठी आमचा अट्टाहास आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत यापुढेही आमचा रास्ता रोको असाच सुरू राहील, असा इशाराही धनगर समाजाच्या वतीने आंदोलनकर्ते लक्ष्मण झोरे यांनी दिला आहे.धनगर समाजाला आरक्षण बरोबरच इतर मागण्यांसाठी सोमवार, दि. २७ रोजी सकाळी ११ वाजता झेंडा चौक पाटण येथे कऱ्हाड-चिपळूण राज्यमार्गावर पाटण तालुका धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको (चक्का जाम) आंदोलन करण्यात आले. वेळी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडून घोषणाबाजी केली धनगर समाजाला गेली ७३ वर्षे आरक्षणापासून वंचित ठेवले गेले आहे. केवळ एका अक्षरामुळे तो म्हणजे र आणि ड शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. शासनाने यात दुरुस्ती करावी. महाराष्ट्रातील गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या पाळणारे यांच्यावर सातत्याने होत असणारे अन्याय दूर करावे. राज्य सरकारने एक हजार कोटीची तरतूद केली आहे त्या तरतुदीची तातडीने अंमलबजावणी करावी.तसेच धनगर समाजाला एसटीचे आरक्षण लागू करूनच मेगा भरती करावी, अशी मागणी याप्रसंगी बोलताना जानू झोरे व इतर आंदोलनकर्त्यांनी बोलताना केली. बऱ्याच वेळानंतर पाटण पोलिसांनी स्वत:हून आंदोलनकर्त्यांना रस्त्यावरून बाजूला केल्यानंतर कऱ्हाड-चिपळूण मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. आंदोलनाप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पाटण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विकास पाडळे यांच्यासह पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.लोणंद शहरात कडकडीत बंद लोणंद : धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गेल्या १२ दिवसांपासून गणेश केसकर हे लोणंद नगरपंचायतीसमोर उपोषणाला बसले आहेत. उपोषणाला बारा दिवस होऊनही राज्य शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. यामुळे दि. २७ रोजी खंडाळा तालुका बंदची हाक खंडाळा तालुका सकल धनगर समाजाच्यावतीने देण्यात आली होती. याला प्रतिसाद देत लोणंद शहरात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळपासून सायंकाळपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. खंडाळा व शिरवळ या ठिकाणी या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
Dhangar Reservation: पाटणमध्ये चक्का जाम!, कऱ्हाड-चिपळूण राज्यमार्गावर आंदोलनकर्त्यांचे ठिय्या आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 12:10 PM