सातारा: गणेश उत्सवामध्ये तब्बल सात वर्षांनंतर पहिल्यांदाच नियम व अटींवर पोलिसांनी लाउडस्पीकरला परवानगी दिल्याने यंदा डाॅल्बी दणाणणार आहे. मात्र, आवाजाचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल केले जातील, असा इशाराही शांतता कमिटीच्या बैठकीत पोलिसांकडून देण्यात आला आहे. पोलिसांच्या या निर्णयावर डॉल्बी चालकांनी टाळ्या वाजवून जल्लोष केला.
साताऱ्यातील पोलीस करमणूक केंद्रामध्ये गुरुवारी शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस उपअधीक्षक मोहन शिंदे, मुख्याधिकारी अभिजीत बापट आदी उपस्थित होते.बैठकीच्या सुरुवातीलाच गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी डाॅल्बीला परवानगी देण्याची मागणी केली. डॉल्बी सगळीकडे वाजतोय मात्र, साताऱ्यातच बंदी का, असा प्रश्न कार्यकर्त्यांनी केला. डॉल्बीला बंदी नसून त्याच्या डेसीबलला बंदी असताना पोलिसांकडून बंदी घातली जात आहे. हे योग्य नसल्याचे कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले. त्यानंतर पोलिसांनी डाॅल्बीबात स्पष्टीकरण दिले. डॉल्बीबाबत सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. त्या आदेशाचे कोणीही उल्लंघन करु नये. लाउडस्पीकरसाठी परवानगी दिली जाणार आहे. मात्र स्पीकरचे डेसीबल तपासले जाईल. असे पोलिसांकडून सांगताच डॉल्बी चालकांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.
कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर शिवेंद्रराजेंची डॉल्बीसाठी मागणीशासनाच्या अटी व निकषानुसार साऊंड, लाईट आणि जनरेटर या व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे केली होती. त्यानुसार डॉल्बीला सशर्त परवानगी दिल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी अधीक्षक बन्सल यांचे आभार मानले.
डाॅल्बीला बंदी नसून त्याच्या जादा डेसीबलला बंदी आहे. यंदा स्पीकरच्या दोन टॉप लावण्यास सशर्त परवानगी देण्याचा विचार आहे. यातूनही डेसीबलचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. - अजयकुमार बन्सल-पोलीस अधीक्षक, सातारा