आॅनलाईन लोकमतसातारा , दि. १७ : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाईचे आदेश दिल्यानंतर सातारा पोलिसांनी या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे. तिसऱ्या दिवशीही महामार्गावर ठिकठिकाणी तपासणी केंद्र उभारण्यात आले असून दुपारी एक वाजेपर्यंत ४० दुचाकीवारांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.
हेल्मेट सक्ती यापूर्वीच करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी ढिलाई दिल्यानंतर अनेक दुचाकीस्वार हेल्मेट न घालताच प्रवास करू लागले आहेत. अपघातामध्ये बळी जाणाऱ्या दुचाकीस्वारांचे प्रमाण वाढल्याचे पोलिसांच्या आकडेवारीवरून दिसून आले. त्यामुळे पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सातारा पोलिसांना दिले आहेत.पोलिसांनी शहरात ही कारवाई न करता सुरूवातीला महामार्गावर कारवाईला सुरूवात केली आहे. महामार्गावरून अनेकजण प्रवास करताना हेल्मेट न घालताच प्रवास करत आहेत. अशा दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
शुक्रवारी सकाळी दहा वाजता येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात पोलिसांनी हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यास सुरूवात केली. महामार्गावर उभ्या असलेल्या पोलिसांना पाहून काहीजण पळून जात होते. अशा दुचाकीस्वारांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले. पळून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना डबल दंड आकारण्यात आला.