कऱ्हाड : कऱ्हाडमधील मुजावर कॉलनीमध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसांना पुण्यातील रिजनल फॉरेन्सिक लॅबचा अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालातून जिलेटिन अथवा अन्य कोणत्याही कारणामुळे हा स्फोट झालेला नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे २५ ऑक्टोबरला घडलेली मुजावर कॉलनीतील घटना गॅस लीकेजमुळेच झाल्याचे समोर आले आहे.मुजावर कॉलनीतील शरीफ मुल्ला यांच्या घरी २५ ऑक्टोबरला सकाळी अचानकपणे स्फोट झाला होता. या स्फोटाची तीव्रता इतकी भयावह होती की, हा स्फोट गॅसमुळे झाला नसून या मागे अन्य कोणते कारण असावे? याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. आमदार नितेश राणे यांनीही पत्रकार परिषद घेत, बॉम्ब बनवितानाच हा स्फोट झाला नाही ना? अशी शंका उपस्थित केली होती.घटनेत झालेले परिसरातील अन्य चार ते पाच घरांचे मोठे नुकसान आणि मोठ्या प्रमाणावर वित्तहानी होण्यासह सात ते आठ लोक जखमी झाल्याने घटनेमागे निश्चित कारण कोणते असावे, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता होती. पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी सर्व शक्यता गृहीत धरूनच तपास सुरू ठेवला होता.
घटनेच्या दिवशी पुण्याहून रिजनल फॅरेन्सिक लॅबमधील पथकाला पाचारण करण्यात आले होते. या पथकाने घटनास्थळावरून आवश्यक नमुने तपासणीसाठी नेले होते. मात्र, हा अहवाल प्रलंबित होता. दोन दिवसांपूर्वी हा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून, आता हा स्फोट गॅस लीकेजमुळेच झाल्याचे समोर आले आहे.घटनास्थळावरून घेतलेल्या नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळेच शरीफ मुल्ला यांच्या घरात झालेला स्फोट गॅस लीकेजमुळेच झाल्याचे स्पष्ट झाल्याने, अन्य सर्व शक्यता व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.