नितीन काळेल ।सातारा : शहरात व आसपास कुठेही आगीची एखादी घटना घडली की अग्निशमन दल सुसज्ज यंत्रणेसह घटनास्थळी दाखल होते. तशाचप्रकारे आता वन विभागाचे कर्मचारी आपल्या हद्दीतील वणवा विझविण्यासाठी ‘फायर प्रूफ’ ड्रेस व सुरक्षित साहित्यासह दाखल होणार आहेत. कारण, पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच साताºयातील वन कर्मचाºयांना आगीपासून संरक्षण करणाºया ड्रेसचे वाटप करण्यात आले आहे.
दिवसेंदिवस झाडांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. आज एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के जागेवर वृक्षसंपदा असावी, असे म्हटले जाते; पण अपवाद वगळता अनेक जिल्ह्यांच्या ठिकाणी वृक्षसंपदा ही २० टक्क्याच्याच आत आहे. त्यातच उन्हाळ्याच्या दिवसात वणवे लागत असल्याने वृक्षसंपदेची मोठी हानी होत असते. वनविभाग व सामाजिक काम करणाºया संस्थांकडून आग विझविण्याचा प्रयत्न केला जातो; पण सुसज्ज यंत्रणा नसल्याने आग वेळेत व लवकर विझवता येत नाही.
परिणामी आग विझेपर्यंत वृक्षसंपदा मोठ्या प्रमाणात भक्ष्यस्थानी पडते. साताºयाचा विचार करता जिल्ह्यात वनक्षेत्र १ लाख ५७ हजार ५१ हेक्टर इतके आहे. जिल्ह्याच्या एकूण क्षेत्राच्या जवळपास ते १४.०५ टक्के आहे. तर सर्वात अधिक महाबळेश्वर तालुक्यात सुमारे २० हजार हेक्टर क्षेत्र असून, सर्वात कमी माण आणि खटाव या तालुक्यात दिसून आढळते.उन्हाळ्याच्या काळात या क्षेत्रात किंवा आसपास आगी लागतात. आसपासची आगही वनक्षेत्रात जाऊन वृक्षसंपदेचे मोठे नुकसान करते. त्यामुळे अशी आग आटोक्यात आणण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी प्रयत्न करतात; पण वेळेत त्या आगीवर नियंत्रण मिळवता येत नाही. परिणामी झाडांचे मोठे नुकसान होत असते. मात्र, सातारा जिल्ह्यातील वन विभागाचे कर्मचारी अशी आग आता लवकर आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत. कारण, त्यांना आगीपासून संरक्षण होण्यासाठी ड्रेसचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात वनविभागाची ११ कार्यालये असून, त्या ठिकाणी प्रत्येकी ३ ड्रेसचे वाटप झाले आहे. या ड्रेससह हेल्मेट, काठी, बूट, हँडग्लोज दिले आहेत.ड्रेसचा असा होणार फायदा...या ड्रेसचा फायदा असा होणार आहे की, आगीपासून संरक्षण होणार आहे. त्याचबरोबर जवळ जाऊन आग विझवताना कोणतीही इजा होणार नाही. फायर प्रूफ ड्रेसमुळे आगीच्या ज्वाळापासून संरक्षण मिळणार आहे. त्यामुळे वृक्षसंपदेची मोठी हानीही टळणार आहे. एका ड्रेसची किंमत ही १५ हजारांपासून ते ३२ हजारांपर्यंत आहे. सातारा जिल्ह्यासाठी ३३ ड्रेसची खरेदी केली असून, त्याची किंमत ३ लाख ८४ हजार रुपये इतकी आहे.
वनक्षेत्रात वणवे लावण्यात येत असल्याने वृक्षसंपदेची मोठ्या प्रमाणात हानी होत असते. अशी हानी टाळणे व वणवा वेळेत आटोक्यात आणण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाºयांना आता ‘फायर प्रूफ’ ड्रेस देण्यात आला आहे. यामुळे वन हद्दीतील आगीवर वेळेतच नियंत्रण मिळवता येणार आहे.- अनिल अंजनकर, उपवनसंरक्षक, सातारा