बामणोली : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कास, बामणोलीसह तापोळा विभागातील स्थानिक ग्रामस्थांची पर्यावरण समृद्ध करण्याची मोहीम मागील काही वर्षांपासून सुरू आहे. मागील १०-१२ वर्षांपासून या परिसरातील स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या मोकळ्या ओसाड डोंगररांगांत तसेच घराशेजारी असणाऱ्या शेताच्या बांधावर विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धनही केले आहे. ग्रामस्थांच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाने कधीकाळी मोकळे असणारे डोंगर आज मोठमोठे वृक्ष व जंगलांनी व्यापून गेले आहे.
जिल्ह्याच्या पूर्व भागात वृक्षसंवर्धनासाठी विशेष प्रयत्न चालू असताना पश्चिमेकडे असणारा हा परिसर पूर्णपणे जंगलांनी व्यापून गेला आहे. जंगलतोड या घातक समस्येने निसर्गचक्र बदलून पावसाचे प्रमाण कमी होत आहे. याचा विपरित परिणाम अन्नसाखळीवर होत असताना याच्या नेमके उलट चित्र कास बामणोली या परिसरात दिसत आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी काही वर्षांपूर्वी सामाजिक वनीकरण विभागाच्या मार्गदर्शनाने मोकळ्या पडीक डोंगरात हजारो वृक्षांची लागवड करून त्यांची जोपासना केली आहे. येथील ग्रामस्थांच्या या प्रयत्नांमुळे हा परिसर गर्द झाडीने हिरवागार बनला आहे. हे सर्व वृक्ष अनेक गावांच्या शेजारील स्वमालकीच्या जमिनीतच बहरले आहेत. मुनावळे, शेंबडी, बामणोली, अंधारी, म्हावशी, सावरी, तेटली, कास, सह्याद्रीनगर, गोगवे, वेगळे, भांबवली, धावली, फुरुस, वाकी या प्रमुख गावांसह इतर अनेक गावांनी वृक्षलागवड मोहिमेत महत्त्वाचा सहभाग नोंदविला आहे.
(चौकट)
वृक्षवाढीची मुख्य कारणे...
अनेक गावच्या शेतकऱ्यांनी सामाजिक वनविभागाकडून आपल्या पडीक जमिनीत मोफत वृक्षारोप न करून घेतले. घरगुती गॅसचा व गोबरगॅसचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने वृक्षतोड थांबली. फक्त वाळलेल्या व सुकलेल्या झाडांच्या फांद्यांचा वापर जळणासाठी होऊ लागला. पाळीव जनावरे कमी झाली. त्यामुळे डोंगरातील मोकळ्या जागेत गवताऐवजी झाडेझुडपे वाढली. नाचणीची शेती करण्यासाठी पूर्वी डोंगरातील झाडेझुडपे तोडून त्यांचे तर वे बनविले जायचे. पुरेसा पाऊस व अनुकूल वातावरण यामुळे नैसर्गिकपणे वृक्षांची वाढ झपाट्याने झाली.
(कोट )
कास व बामणोली विभागांत अनेक गावांमध्ये झाडांची वाढ खूप जास्त प्रमाणात होत आहे. ही अभिमानास्पद बाब आहे. गावात खूप कमी लोक राहू लागले. जनावरांचेही प्रमाण खूप कमी झाले. वृक्षतोड थांबली. तसेच अनेक ग्रामस्थांनी वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन केले. पर्यावरण संवर्धनासाठी हे खूपच महत्त्वाचे ठरत आहे.
-श्रीरंग शिंदे, वनपाल, बामणोली
२०बामणोली
कास, बामणोलीसह तापोळा विभागातील ग्रामस्थांच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाने कधीकाळी मोकळे असणारे डोंगर आज मोठमोठे वृक्ष व जंगलांनी व्यापून गेले आहे.