वाई : तालुक्यातील भोगाव हद्दीतून सागवानाच्या इमारतीच्या लाकडाची विनापरवाना वाहतूक करताना संशयित स्वप्निल प्रकाश बांदल (वय २५, रा. पाचवड) याला वनविभागाने टेम्पोसह ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.टेम्पोमधून (एमएच ११ एएल ५९८८) विनापरवानगी सागाच्या लाकडांची वाहतूक करताना बांदल आढळून आला. साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दरम्यान, प्रकाश बांदल पुन्हा बुधवार, दि. २४ रोजी वाईतील मोतीबाग परिसरातून कालव्यावरून टेम्पोमधून (एमएच १२ एफसी ७३६१) विनापरवाना सागवान लाकडाची वाहतूक करताना मिळून आला. वनविभागाने अंदाजे ५ लाख ५४ हजारांचा लाकूडसाठ्यासह गाडी ताब्यात घेतली आहे.
दोन्ही दिवशी केलेल्या कारवाईत ८ लाख ६९ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. वाई वनविभागाने केलेल्या या धडक कारवाईमुळे लाकूडमाफियांचे धाबे दणाणले आहे. या मोहिमेमुळे तालुक्यातील बेसुमार वृक्षतोडीला लगाम बसणार आहे.वनविभागाने पंचनामा करून गाडी मालासह आरोपीला ताब्यात घेतले आहे. अंदाजे ८ लाख ६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती वनविभागाचे वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.ही कारवाई उपसंरक्षक भारतसिंह हाडा, सहायक वनरक्षक व्ही. बी. भडाळे, वाई वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंज परिमंडलाचे वनपाल सुरेश पटकारे, संग्राम मोरे, वनरक्षक वैभव शिंदे, सुरेश सूर्यवंशी, संदीप पवार, प्रदीप जोशी, संजय आडे, अजित पाटील यांच्या पथकाने केली.