वडूज : धोंडेवाडी, ता. खटाव येथील वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून पक्के घर बांधण्यात आले होते. ही माहिती मिळाल्यानंतर वनविभागाने अतिक्रमणांवर हातोडा मारला. तर इतर जागेवरील अतिक्रमणही पोलीस कर्मचारी, वनक्षेत्रपाल शीतल फुंदे व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन जेसीबीच्या साहाय्याने काढून टाकले.
याबाबत वनविभागाकडून समजलेली माहिती अशी की, धोंडेवाडी, ता. खटाव हद्दीत वनक्षेत्र ८३६ मधील गट नंबर ५० मध्ये अतिक्रमण असलेल्या वनगुन्हा यापूर्वीच दाखल करण्यात आला होता. वनक्षेत्रातील ०.३६ हेक्टरवर धोंडीराम नाथा मासाळ यांनी अतिक्रमण करून पक्के घर बांधलेले होते. इतर तीन जणांनी जनावरांचा गोठा व शेतजमीन तयार करून अतिक्रमण केलेले होते. हे अतिक्रमण काढून टाकण्याची कारवाई वनसंरक्षक एम. एन. मोहिते व एस. बी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत वनक्षेत्रपाल शीतल फुंदे, वनसर्व्हेक्षक म. हु. शेख, वनरक्षक, वनमजूर व पोलीस कर्मचारी यांचा सहभाग होता. सदर जागेतील अतिक्रमण काढून ती जागा वनविभागाच्या ताब्यात घेण्यात आली.
फोटो २४ वडूज-अतिक्रमण
धोंडेवाडी, ता. खटाव येथील वनविभागाच्या जागेवरील अतिक्रमणातील घर पाडण्यात आले. (छाया : शेखर जाधव)
---------------------------------