सातारा : सातारा तालुक्यातील परळी वन परिमंडळ परिसरात शिकारीच्या उद्देशाने आलेले चौघेजण वन विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. राहुल बजा राम यादव (वय ३५), बाबूराव गंगाराम चव्हाण (३९), राहुल वसंत जगताप (२८), विजय गुलाबराव गोडसे (३०, सर्व रा. कुसवडे भाटमरळी) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
वनविभागाचे अधिकारी शीतल राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी वन परिमंडलात चारजण शिकारीसाठी लागणारी हत्यारे घेऊन गुरुवार, दि. २६ च्या रात्री फिरत होते. या जंगल परिसरात गस्त घालत असताना वन कर्मचारी योगेश गावित, महेश सोनवले, रंजीत काकडे यांना संशय आल्याने यांनी त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी शिकार करण्याची हत्यारे आढळली. यावरूनच त्यांना वनहद्दीत अटक केली.
त्यांच्याविरोधात न्यायालयामध्ये वन्यजीव अधिनियम १९७२ च्या भारतीय वन अधिनियम गुन्हा दाखल करून २८ डिसेंबरपर्यंत वनकोठडीची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. ही कारवाई उपवन संरक्षक भारतसिंह हाडा यांच्या नेतृत्वाखाली सहायक वनसंरक्षक विश्वास भढाळे व वनक्षेत्रपाल शीतल राठोड यांनी केली.