सातारा: लाकडाच्या वखारीवर कारवाई न करण्यासाठी पंधरा हजारांची लाच स्वीकारताना कऱ्हाड तालुक्यातील चोरे येथील वनरक्षकाला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी पाल, (ता. कऱ्हाड) येथे करण्यात आली.राहुल बजरंग रणदिवे (वय ३४, रा. कोयना सोसायटी, विलासपूर, गोडोली सातारा) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या वनरक्षकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, पन्नास वर्षीय संबंधित तक्रार हे पाल, (ता. कऱ्हाड) येथील राहाणारे आहेत.
त्यांच्या लाकडाच्या वखारीवर कारवाई न करण्यासाठी चोरे बीटचा वनरक्षक राहुल रणदिवे याने त्यांच्याकडे सुरूवातीला २५ हजारांची मागणी केली. मात्र, तडजोडीअंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, तक्रारदाराने साताऱ्यातील लाचलुचपत कार्यालयात येऊन रितसर लेखी तक्रार नोंदवली.
त्यानंतर लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता रणदिवे हा लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. सायंकाळी पाल येथे अधिकाऱ्यांनी सापळा लावला असता रणदिवे हा पंधरा हजारांची लाच घेताना रंगेहाथ जाळ्यात अडकला.पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, पोलीस नाईक ताटे, खरात आणि येवले यांनी ही कारवाई केली.