पाटण : कोयना अभयारण्यात नाला बंडिंगच्या केलेल्या कामाच्या मोबदल्यात तसेच वाढीव कामाचे बिल काढण्यासाठी व भविष्यात कामे देण्यासाठी कोयनानगरच्या वन्यजीव कार्यालयातील वनक्षेत्रपाल व वनपाल यांना १९ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. वनक्षेत्रपाल राजेंद्र रावसो पाटील (वय ३१, सध्या रा. फॉरेस्ट कॉलनी, कोयनानगर रासाटी, मूळ रा. पाडळी खुर्द, ता. करवीर, जि. कोल्हापूर) व वनपाल सुदाम विष्णू माने (५४, सध्या रा. सुर्वे बिल्डिंग, रामापूर पाटण, मूळ रा. मस्करवाडी, पोस्ट अंबवडे बुद्रुक, ता. जि. सातारा) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी (दि. २४) केलेली पडताळणी व सापळा कारवाईमध्ये वनक्षेत्रपाल राजेंद्र पाटील व वनपाल सुदाम माने यांनी तक्रारदारांकडे तडजोडीअंती १९ हजार ५०० रुपये लाच रक्कम स्वीकारली. वनपाल सुदाम मानेने वन्यजीव कार्यालय येथे ही रक्कम स्वीकारल्यानंतर त्यांना पकडण्यात आले. दोघांच्याविरुद्ध कोयनानगर पोलिस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बयाजी कुरळे, सहायक फौजदार कुलकर्णी, हवालदार सपकाळ, तेजपाल शिंदे, संजय साळुंखे, अजित कर्णे, प्रशांत ताटे, विनोद राजे, संभाजी काटकर यांनी ही कारवाई केली. पोलिस निरीक्षक बयाजी कुरळे अधिक तपास करीत आहे. (प्रतिनिधी)
वनक्षेत्रपाल, वनपाल लाचलुचपतच्या जाळ्यात
By admin | Published: April 24, 2017 11:29 PM