बामणोली : न्यायालयीन आदेशाच्या अंमलबजावणीला दफ्तरदिरंगाईमुळे विलंब होत असल्याने वनकामगार संघटनेने उपोषणाचा इशारा दिला आहे. १८ जानेवारीपासून वयोवृध्द, निवृत्त वनमजूर वनविभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलनास बसणार असल्याची माहिती वनकामगार संघटनेचे सचिव प्रकाश शिंदे यांनी दिली.
वनकामगारांनी वेळोवेळी केलेल्या विविध मागण्या व काही प्रकरणात न्यायालयाचे आदेश प्राप्त होऊन २० वर्षे होऊनही त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने वनकामगारांना न्याय मिळावा म्हणून धरणे आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले.
शिंदे म्हणाले, निवृत्तीवेतन मिळावे तसेच इतर मागण्यांसंदर्भात वनकामगारांनी केलेल्या तक्रारीवर न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणे आवश्यक असतानाही दफ्तरदिरंगाई केली जात आहे. त्यामुळे गरीब असलेल्या वनकामगारांचा धीर आता सुटू लागला आहे. त्यामुळे त्यांनी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.