सातारा : जिल्हा प्रशासनाच्या वतीने साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरचे (भुयारी मार्ग) उद्घाटन शुक्रवार, २९ जानेवारी रोजी केले जाणार आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर अनेक मंत्री व मान्यवरांची नावे आहेत. मात्र, शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या नगराध्यक्षा माधवी कदम यांचे नाव पत्रिकेवर नसल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.
आठ रस्ते एकत्र जोडणाऱ्या पोवई नाक्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी याठिकाणी ग्रेड सेपरेटरची उभारणी करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच खासदार उदयनराजे भोसले यांनी या ग्रेड सेपरेटरचे अचानक उद्घाटन करून सर्वांनाच धक्का दिला. या धक्कातंत्रामुळे चांगल्या-वाईट प्रतिक्रियाही उमटल्या. दरम्यान, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ग्रेड सेपरेटरचे शासकीय उद्घाटन करणार असल्याचे नुकतेच सांगितले होते. तर शनिवारी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दि. २९ रोजी उद्घाटनाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती दिली.
या कार्यक्रमाचे निमंत्रण अनेक मंत्री महोदयांना देण्यात आले आहे. मात्र, साताऱ्याच्या प्रथम नागरिक असलेल्या नगराध्यक्षा माधवी कदम यांचेच नाव निमंत्रण पत्रिकेत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दि. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी खा. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवशी ग्रेड सेपरेटरचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेतेमंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती. यावेळी दस्तुरखुद्द शरद पवार यांनी नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या नावाचा उल्लेख करून त्यांना पहिल्या पंक्तीत उभे राहावे, अशी विनंती केली होती. या कार्यक्रमाच्या कोनशिलेवर देखील नगराध्यक्षांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला. त्यामुळे प्रोटोकॉलनुसार नगराध्यक्षांना देखील या कार्यक्रमाचे निमंत्रण देणे व निमंत्रण पत्रिकेवर त्यांचे नाव असणे क्रमप्राप्त आहे. मात्र, पत्रिकेवरच नाव नसल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. ही चूक असेल तर प्रशासनाने ती दुरुस्त करावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.