सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात सर्वत्रच कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र, त्याकडे नागरिकांचे विशेष लक्ष नाही. काेरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासन विविध पातळीवर लढा देत आहे. मात्र, नागरिकांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना होताना दिसत नाहीत. त्याचाच एक भाग म्हणजे नागरिकांकडून सॅनिटायझरचा वापर करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. दुकानदारांनीही सॅनिटायझर ग्राहकांना उपलब्ध करुन देण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा ही साखळी अशीच कायम राहणार आहे.
-------------
घाटातील रस्ते ओस
खंडाळा : लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे सर्वच सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे अनावश्यक गावी जाण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर घटले आहे. त्यामुळे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. महामार्गावरील खंबाटकी घाटातील रस्ते ओस पडले आहेत. रस्त्यावर एकच वाहन तुरळक स्वरुपात आढळत असल्याने दुचाकीस्वार गाडी न्यूट्रल करुन चालवत आहेत. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.
--------
लिंबांचे दर तेजीत
सातारा : एप्रिल महिना संपत आल्याने लिंबाच्या दरावर त्याचा परिणाम झाला आहे. सर्वसाधारणपणे वर्षभर दहाला पाच तर काहीवेळेला दहाला दहा लिंबे मिळत होती. त्यांचे दर आता तेजीत आहेत. साताऱ्यातील बाजारपेठेत लिंबांची आवक खूपच मंदावली आहे. ज्या व्यापाऱ्यांकडे कांदे आहेत, ते वीस रुपयांना चार देत आहेत. उन्हाळा वाढत असल्याने लिंबांना मागणी आहे. मात्र, दर तेजीत असल्याचा फटका बसत आहे.
---०००००
पर्यटनस्थळे लॉकडाऊन
महाबळेश्वर : महाबळेश्वर, पाचगणीत उन्हाळा हंगाम मार्चपासूनच सुरू होतो. तसेच शाळांच्या परीक्षा झाल्यानंतर एप्रिलमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत असतात. यंदा मात्र कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने सर्वसामान्य जनता घरात बसली आहे. त्यामुळे पर्यटनस्थळेही लॉकडाऊन झाली आहेत. सर्वच पॉईंट सुनसान दिसत आहेत.
००००००००००००
भूजल पातळी खालावली
सातारा : सातारा शहरातील अनेक भागांमध्ये नागरिक कुपनलिकांचे पाणी वापरतात. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने भूगर्भातील पाणीपातळी खालावत चालली आहे. त्यामुळे दिवसभरात खूपच कमी वेळ पाणी उपसा होतो. त्यामुळे अनेक भागात टँकरने पाणी विकत आणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यामुळे मे महिना कसा जाणार, हा प्रश्न सतावत आहे.
०००००००००
रस्ते दुरुस्तीची मागणी
सातारा : कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यावर वाळूही पडली आहे तर काही ठिकाणी चर खोदलेले आहेत. या बाबी अपघातांना निमंत्रण देत आहेत. त्यामुळे सध्या वाहतूक कमी असताना महामार्ग दुरूस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
००००००००००००
गॅस वितरण सुविधेपासून वंचित
सातारा : लॉकडाऊन काळात कोणीही घरातून बाहेर पडू शकत नाही. अशा संकटप्रसंगी गॅस एजन्सीचे वितरक मात्र घरोघरी जाऊन गॅस सिलिंडर पोहोच करत आहेत. मात्र, त्यातील अनेकांना अत्यावश्यक सुविधाही मिळालेल्या नाहीत. स्वत:च्या खर्चातून सॅनिटायझर, मास्क खरेदी करुन ते सेवा बजावत आहेत.