खंडाळा : कोरोनामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले असतानाच वीज वितरण कंपनीने दिलेली लाईट बिले अन्यायकारक आहेत. शासनाने शेतकरी व ग्राहकांची वीज बिले माफ करावीत. शेतीपंपाबरोबरच घरगुती वीज कनेक्शन तोडू नयेत, अशी मागणी करणारा ठराव खंडाळा पंचायत समितीच्या मासिक बैठकीत करण्यात आला.
खंडाळा पंचायत समितीची मासिक बैठक सभापती राजेंद्र तांबे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उपसभापती वंदना धायगुडे-पाटील, सदस्य चंद्रकांत यादव, शोभा जाधव, मकरंद मोटे, अश्विनी पवार, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
विविध विभागांचा आढावा घेताना पशुसंवर्धन खात्याच्या वतीने
खंडाळा तालुक्यातील गावागावात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. या भटक्या श्वानांच्या हल्ल्यात अनेकांचे जीव घेतले आहेत. काही महिन्यात श्वानदंशाने शंभरी पार केली आहे. कुत्र्यांची वाढती संख्या रोखण्याची गरज म्हणून कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याची मोहीम ग्रामपंचायतीमार्फत हाती घेण्यात यावी. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करण्याची सूचना सभापती राजेंद्र तांबे यांनी केली.
शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त जातींच्या मुलींना मिळणारा उपस्थिती भत्ता बंद आहे. अनेक मुली शाळाबाह्य होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने उपस्थिती भत्ता सुरु करावा. जिल्ह्यात व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मुलांचे आरोग्य लक्षात घेऊन शाळा बंद करुन ऑनलाईन शिक्षण चालू ठेवावे अशी मागणी सदस्या शोभा जाधव यांनी केली.
पंचायत समितीच्या मासिक बैठकीला खंडाळा तालुक्यातील विविध खात्याचे खातेप्रमुख अनेक महिने बैठकांना उपस्थित राहिले नाहीत. त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत वरिष्ठांशी पत्रव्यवहार करण्यात यावा अशी मागणी सदस्यांनी केली.
गावागावात ग्रामविकास समितीची नेमणूक करण्यात आली नाही. त्यामुळे कृषी खात्याच्या अनेक योजना गाव पातळीवर राबविताना अडचणी येत असल्याने या समितीचे गठण करण्याची गरज असल्याचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी अनिल डोईफोडे यांनी सांगितले. त्यावर लवकरच पदाधिकारी व ग्रामसेवक संघटना यांच्यासमवेत बैठक घेऊन त्यावर मार्ग काढण्यात येईल असे सभापती राजेंद्र तांबे यांनी सांगितले.
‘ग्रामीण भागातील मुक्कामी एसटी बस पुन्हा सुरू कराव्यात,’ अशी मागणी उपसभापती वंदनाताई धायगुडे-पाटील यांनी केली. वंदना धायगुडे-पाटील यांनी आभार मानले.