सैदापुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावलेले फलक अज्ञातांनी फाडले, थेट समोर येण्याचे काँग्रेसप्रेमींचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 06:00 PM2022-01-06T18:00:41+5:302022-01-06T18:12:15+5:30
माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सैदापूर गावाच्या विकासकामांसाठी सुमारे ६५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या निधी मंजुरीबाबत चव्हाण यांच्या अभिनंदन व आभाराचे फलक सैदापूर परिसरात लावले आहेत.
कऱ्हाड : माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सैदापूर गावाच्या विकासकामांसाठी सुमारे ६५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या निधी मंजुरीबाबत चव्हाण यांच्या अभिनंदन व आभाराचे फलक सैदापूर ग्रामस्थ तसेच काँग्रेस कमिटीच्या वतीने परिसरात लावले आहेत. त्यातील अभियांत्रिकी महाविद्यालय ते आयटीआय मार्गावर असणारे फलक काही समाजकंटकांनी फाडून नुकसान केले.
हा प्रकार निंदनीय आहे. विरोधकांनी असे लपून-छपून कृत्य न करता हिम्मत असेल तर थेट पुढे यावे, असे आव्हान सैदापूरमधील काँग्रेसप्रेमींनी दिले आहे.
माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी सैदापूरसाठी नागरी आरोग्य केंद्राला मंजुरी मिळवून दिली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी पन्नास लाख तसेच रस्त्यांसाठी काही निधी मंजूर करून दिला. याबद्दल सैदापूर ग्रामस्थ व काँग्रेसप्रेमींनी या परिसरात ठिकठिकाणी पृथ्वीराज चव्हाण यांच्या अभिनंदनाचे फलक लावले. त्यातील आयटीआय रोड ते अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मार्गावरील काही फलक फाडण्यात आले.
त्याबद्दल ग्रामस्थ तसेच काँग्रेसप्रेमी आक्रमक झाले. या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यामध्ये कऱ्हाड तालुका काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष नानासाहेब जाधव, खादी ग्रामोद्योगचे तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव, माजी उपसरपंच सचिन पाटील, विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब प्रल्हाद जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य तानाजी माळी आदींसह काँग्रेसप्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते.