काँग्रेस पक्षाध्यक्ष निवडणुकीत 'पृथ्वीराज' दंड थोपटणार?, राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा
By प्रमोद सुकरे | Published: September 1, 2022 07:22 PM2022-09-01T19:22:11+5:302022-09-01T19:23:17+5:30
कराड : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने पक्षांतर्गत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. पण पक्षांतर्गत वाद काही थांबायला तयार नाही. या ...
कराड : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने पक्षांतर्गत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. पण पक्षांतर्गत वाद काही थांबायला तयार नाही. या निवडणूक प्रक्रियेवरच ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनी आक्षेप घेत नुकताच पक्षाला रामराम ठोकला. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. आता तर नाराज गट पक्षाध्यक्ष निवडणुकीत उतरणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेही नाव आघाडीवर आहे. त्यामुळे सोनिया गांधींचे किचन कॅबिनेट म्हणून परिचित असणारे 'पृथ्वीराज' गांधींविरोधात दंड थोपटणार का? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
वास्तविक पृथ्वीराज चव्हाण यांचा परिवार हा गांधी परिवाराचा निष्ठावंत म्हणून ओळखला जातो. इंदिरा काँग्रेसच्या स्थापनेनंतर पहिली बैठक कराडमध्ये चव्हाणांच्या घरात झाली होती. आणि प्रेमिलाताई चव्हाण या इंदिरा काँग्रेसच्या पहिल्या प्रदेशाध्यक्ष झाल्या होत्या. याच कुटुंबातील आनंदराव चव्हाण प्रेमीलाताई चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेक वर्ष लोकसभा व राज्यसभेवर खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. आनंदराव चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांना केंद्रीय मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळालीच पण पक्षाने केंद्रात मंत्री म्हणून काम करत असताना पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधीही अनपेक्षितपणे उपलब्ध करून दिली. सध्या ते कराड दक्षिणचे आमदार आहेत.
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची निवडणूक झाली .पण पक्षाची सत्ता गेली. त्यामुळे पक्ष नेतृत्व त्यांच्यावर नाराज झाल्याचे आजही बोलले जाते. पण याच पृथ्वीराजांनी अडीच वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण प्रत्यक्षात त्यांना मंत्रिमंडळात किंवा सत्तेमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी कोठे स्थान मिळालेले नाही.उलट त्यांच्या मतदार संघात त्यांना त्रासच सहन करावा होता.
सन १९९५ नंतर माहितीचा विस्फोट झाला. आणि याचा फायदा उठवत १९९९ ला केंद्रात भाजपचे वाजपेयी सरकार आले. डिजिटल च्या जमान्यात ५० ते ६० वर्षे सत्ता सांभाळणाऱ्या काँग्रेसला काळाबरोबर बदलत लोकांना आपलंसं करता आलेलं नाही असंच दुर्दैवाने म्हणावे लागेल. पण भाजपने याचा पुरेपूर फायदा उठवत काँग्रेसला टार्गेट केले आणि हळूहळू काँग्रेसचे पानिपत व्हायला सुरुवात झाली.
गत १० वर्ष मोदी पर्व सुरू आहे. मात्र काँग्रेसला भाजपला तोंड द्यायला फारसे जमलेले दिसत नाही. भाजपच्या झंझावातात सोनियांचे नेतृत्व कमी पडू लागले हे लक्षात आल्यानंतर गत चार-पाच वर्षापासून पक्षाध्यक्ष बदलाची चर्चा सुरू आहे .
नेतृत्व बदलाची ही हवा सुप्त होती पण 23 ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून आपली खदखद मांडली. मात्र हे पत्र फुटले त्याने बरेच राजकारण पहायला मिळाले.
आता पक्षाने निवडणूक कार्यक्रम राबवला आहे खरा पण, या प्रक्रियेवरच आक्षेप घेत गुलाम-नवी आझाद यांनी नुकताच राजीनामा दिला. या अगोदर कपिल सिबल यांनीही सोडचिट्टी दिलेली आहे. त्यातच पृथ्वीराज चव्हाण यांनी आझाद यांची नुकतीच घेतलेली भेट, त्यानंतर दिलेल्या प्रतिक्रिया, नाराज नेत्यांनी मागितलेली मतदार यादी यावरून बराच मोठा गोंधळ समोर येतोय. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक झाल्यास पृथ्वीराज चव्हाण या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी दंड थोपटणार का? याबाबत चर्चा न झाल्यास नवलच!
पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा
काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळाला अशी भावना यापूर्वीही पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेकदा व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांनी पूर्णवेळ अध्यक्षपद स्वीकारले तर अधिक आनंद होईल असेही ते म्हणाले होते. मात्र त्यानंतर ज्या 23 नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र पाठवले त्या पत्रावर 'पृथ्वीराज' यांचीही सही आहे. त्यामुळे गांधी व चव्हाण यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे हे निश्चित!