अखेर आनंदराव पाटील 'निमंत्रित' भाजपवासी!
By प्रमोद सुकरे | Published: May 6, 2023 09:53 PM2023-05-06T21:53:47+5:302023-05-06T21:54:23+5:30
काँग्रेसच्या माजी आमदारांची भविष्यातील वाटचाल स्पष्ट
कराड : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पासून दुरावलेले काँग्रेसचे माजी आमदार आनंदराव पाटील अखेर भाजपवासी झाली आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या भाजपच्या प्रदेश कार्यकारणीत निमंत्रित सदस्य म्हणून त्यांचे नाव घेण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या पुढील वाटचालीबाबत वेळोवेळी उत्तर देणे टाळणाऱ्या आनंदराव पाटील यांच्या भूमिकेवर शिक्कामोर्तबच झाले आहे.
आनंदराव पाटील हे मूळचे कोयनानगर परिसरातले. मात्र कोयना धरण उभारणीच्या वेळी विस्थापित झाल्यानंतर त्यांचे पुनर्वसन कराड तालुक्यातील विजयनगर येथे झाले. आनंदराव पाटील यांनी तत्कालीन खासदार प्रेमीलाताई चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेस पासून आपली राजकीय कार्यकिर्द सुरू केली. पुढे अनेक वर्ष ते सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहिले. दरम्यानच्या काळात त्यांनी कराड उत्तर विधानसभा मतदार संघातून दोन वेळा काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवली. पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती.
पृथ्वीराज चव्हाण केंद्रात पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री झाल्यावर आणि त्यानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून आल्यावर आनंदरावांना 'मिनी मुख्यमंत्री' म्हणून ओळखले जाऊ लागले होते.मग ते विधान परिषदेवर आमदारही झाले. पण गत विधानसभा निवडणुकीपूर्वीच त्या दोघांच्यात अंतर पडले. त्याचे कारण निश्चित समोर आलेच नाही. पण आनंदराव पाटील विधानसभेच्या प्रचारात कुठे दिसलेच नाहीत. त्यांचे पुतणे सुनील पाटील व मुलगा प्रताप पाटील मात्र भाजपच्या प्रचारात दिसत होते.पण त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनीच बाजी मारली.
त्यानंतर वेळोवेळी आनंदराव पाटलांनी आपली पुढील राजकीय वाटचाल लवकरच मांडू असे माध्यमांना सांगितले खरे, पण ते जाहीर केलेच नाही. नुकत्याच झालेल्या कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील, भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांच्यासोबत ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यावेळीही माध्यमांनी तुम्ही राष्ट्रवादी की भाजप म्हणून यात सहभागी झाला आहात? असे छेडले. पण सहकारातील निवडणुका पक्षीय नसतात; आम्ही आघाडी म्हणून लढत आहोत असे सांगत त्यांनी उत्तर देणे टाळले.
पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच महाराष्ट्र प्रदेश भाजपची जम्बो कार्यकारणी जाहीर केली. त्यात आनंदराव पाटील यांना निमंत्रित सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे आनंदराव पाटील भाजपचे सदस्य झाले आहेत, ते भाजवासी झाले आहेत यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
कराडला झुकते माप
भाजपच्या प्रदेश कार्यकारणीत कराडच्या ७ जणांना स्थान मिळाले आहे. त्यात उपाध्यक्ष - विक्रम पावस्कर, सचिव- अँड. भरत पाटील तर निमंत्रित सदस्य म्हणून डॉ. अतुल भोसले, शेखर चरेगावकर, आनंदराव पाटील रामकृष्ण वेताळ, स्वाती पिसाळ यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या कराडकरांची जबाबदारीही निश्चितच वाढली आहे.
सन आणि सैनिक अगोदरच दाखल
माजी आमदार आनंदराव पाटील यांचा मुलगा प्रताप पाटील, पुतणे बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील पाटील यांनी गत विधानसभा निवडणुकीपूर्वीच मुंबईत जाऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र आनंदराव पाटील यांनी स्वतः कुठलीच भूमिका मांडली नव्हती.