सातारा : महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून सातारा लोकसभेसाठी माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. याबाबत दोन दिवसात घोषणा होणार असून सोमवार, दि. १५ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघासाठी महायुती आणि महाआघाडी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलेला नाही. महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे मतदारसंघ असला तरी उमेदवारी निवडीवरून पेच निर्माण झाला होता. खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणावरून माघार घेतली. त्यामुळे पक्षापुढे उमेदवार कोण द्यायचा हा प्रश्न होता.यासाठी शरद पवार यांनी साताऱ्यात बैठक घेतली होती. त्यानंतर दोन दिवसात उमेदवार ठरवू असे सांगितले होते. आता या घटनेला आठ दिवस होऊन गेल्यानंतर साताऱ्याचा उमेदवार जवळपास स्पष्ट झाला आहे. याबाबत मंगळवारी किंवा बुधवारी घोषणा होऊ शकते. पवार यांनी माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे हे सोमवार दि. १५ रोजी सातारा लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरणार आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इंडिया आघाडीचे जिल्ह्यातील नेतेही उपस्थित राहणार आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा सातारा उमेदवारीचा तिढा सुटलेला आहे.
LokSabha 2024: राष्ट्रवादी शरद पवार गटाचा साताऱ्याचा उमेदवार ठरला; घोषणेची औपचारिकता बाकी
By नितीन काळेल | Published: April 08, 2024 3:54 PM