सातारा : साताऱ्यात भाजपचे उमेदवार उदयनराजेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आल्यावर माजी खासदार अमर साबळे यांचे पाकिट चोरुन नेण्यात आले. यामध्ये रोख रकमेसह धनादेश, पॅनकार्ड, आधारकार्ड आदींचा समावेश होता. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी भाजपचे राज्यसभेचे माजी खासदार व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे (रा. पुणे) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार दि. १८ एप्रिल रोजी दुपारी पावणे तीनच्या दरम्यान सातारा शहरातील पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान हा प्रकार घडला.पोलिसांनी सांगितले की, माजी खासदार अमर साबळे हे भाजपचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा अर्ज भरण्यासाठी साताऱ्यात आले होते. त्यावेळी गर्दीत त्यांच्या त्यांच्या खिशातील पाकीट चोरुन नेण्यात आले. पाकिटात पॅन कार्ड, विविध बॅंकांचे धनादेश होते. तसेच १२ हजार रुपयांची रोकड होती. सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत.
शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीवेळीही चोरी..राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी १५ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळीही गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दोन ठिकाणी डल्ला मारला होता. याप्रकरणीही पोलिसांत गुन्हा नोंद झालेला आहे.