पुसेगाव : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचे नेरुळ येथील अपोलो हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्यावर मंगळवारी त्यांच्या मूळगावी पुसेगाव येथील येरळा नदीकाठी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली आहेत.
धनंजय जाधव यांचे मूळगाव सातारा जिल्ह्यातील पुसेगाव असून येथे १९४७ मध्ये त्यांचा जन्म झाला. पुसेगावातच त्यांचे प्राथमिक शिक्षण तर माध्यमिक शिक्षण वाई येथे झाले. त्यानंतर त्यांनी एम.एससी.ची पदव्युत्तर पदवी घेतली होती. प्रथम ते रायगडला शिक्षणाधिकारी म्हणून रूजू झाले. १९७२ ला ते केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले. आयपीएस अधिकारी म्हणून ते धुळे येथे रूजू झाले. त्यानंतर वर्धा, अहमदनगर, पुणे महामार्ग या ठिकाणी पोलीस अधीक्षक म्हणून काम केले. १९९२ मध्ये पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित केले होते. २००२ मध्ये त्यांना अपर पोलीस महासंचालक म्हणून पदोन्नती देऊन महामार्ग सुरक्षा रक्षक पथक प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
काही काळानंतर त्यांची कोल्हापूर परिक्षेत्रात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. धनंजय जाधव यांनी २००४ ते २००७ या काळात पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून काम पाहिले. त्यानंतर २००७ ते २००८ या काळात त्यांची नियुक्ती मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून करण्यात आली. याच पदावरून ते निवृत्त झाले होते.
निवृत्तीनंतर त्यांनी एमपीएससी बोर्डवर दोन वर्षे काम केले. नंतर त्यांच्या मूळ गावी, पुसेगाव या ठिकाणी त्यांनी पोतदार इंग्लिश शिक्षण संस्था सुरु केली. तसेच शेतीत उत्तम प्रकारे विकास करून शेततळे, जनावरांचा गोठा उभारणी करत फळबागाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे.
धनंजय जाधव हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर होते. निवृत्तीनंतर विविध राजकीय पक्ष त्यांचा राजकारणात सक्रिय सहभाग करुन घेण्यासाठी प्रयत्न करत होते; मात्र शेवटपर्यंत ते राजकारणापासून ते अलिप्त राहिले; मात्र त्यांचे धाकटे बंधू ॲड. श्रीकृष्ण जाधव यांना पुसेगावचे सरपंच करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
आयकार्ड फोटो
३०धनंजय जाधव