पसरणी : एकसर (ता. वाई) येथील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मयूर चव्हाण यांनी गावातील सार्वजनिक पाण्याची स्कीम नादुरुस्त झाली असून, त्यामुळे एकसर गाव व परिसराला पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. ही नादुरुस्त पाण्याची योजना नव्याने करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे. त्यासाठी अनेक वेळा पाठपुरावा करूनही त्यात यश न आल्याने पाण्याची स्कीम मंजूर होत नाही, तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा अनोखा निर्णय त्यांनी घेतला आहे.
सरपंच चव्हाण यांच्या या निर्णयाने सर्वजण अचंबित झाले आहेत. ग्रामस्थांनी त्यांना अनेक वेळा समजाविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यात ग्रामस्थांना यश आले नाही. माजी सरपंच मयूर चव्हाण आपल्या निर्णयावर ठाम आहेत. पाणी पुरवठा विभागाला जाग आणण्यासाठी त्यांनी हा एक आगळा वेगळा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाची एकसर परिसरात सगळीकडे चर्चा आहे.
१९८५ मध्ये एकसर गावातील सार्वजनिक पाण्याची स्कीम कृष्णा नदीतून करण्यात आली होती. त्यावेळी गावाची लोकसंख्या सातशे ते आठशे होती. तीच लोकसंख्या आजमितीला दोन हजारांपेक्षा जास्त आहे. गावची लोकसंख्या वाढल्यामुळे व ती पाण्याची स्कीम जुनी व जीर्ण झाली आहे. तिला दुरुस्तीसाठी अनेक वेळा खर्च करावा लागतो. गावची लोकसंख्या नजरेसमोर ठेवून मयूर चव्हाण यांनी सरपंच असल्याच्या कालावधीत वाई पंचायती समितीच्या माध्यमातून आमदार फंडातून जिल्हा परिषदेच्या पाणी पुरावठा विभागाकडे नवीन पाण्याची स्कीम होण्यासाठी पाठपुरावा केला होता; परंतु त्याला यश आले नाही. ही योजना गेल्या पाच ते सहा वर्षांपासून प्रलंबित आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेतून ही स्कीम त्वरित मंजूर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.ग्रामसभेतच निर्णय जाहीर...एकसर ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या ग्रामसभेत हा चप्पल न घालण्याचा निर्णय मयूर चव्हाण यांनी जाहीर केला. यावेळी विद्यमान सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, सरपंच रुपाली घाडगे, ग्रामसभा अध्यक्ष बाळकृष्ण तरडे, उपसरपंच स्वाती पवार, माजी सरपंच नारायण घाडगे, युवराज चव्हाण, सदस्य रमेश घाडगे, नवनाथ सणस, वंदना शेलार, यशोदा मालुसरे, सुनीता कळंबे, जितेंद्र सपकाळ, बबन चव्हाण, बाबूराव घाडगे, मधुकर चव्हाण, महादेव शेलार आदी उपस्थित होते.