सातारा : ‘आयुष्यात कितीही ठिकाणी शिक्षण घेतलं तरी आपल्या डोक्यातून शाळेचे शिक्षक आणि तिथली शिस्त जास्त नाही. आपापल्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेतील माजी विद्यार्थ्यांना एकत्रित करून त्यांच्या मदतीने शाळेला नवं रूप देण्याची संकल्पना जिल्हा परिषदेने राबवावी,’ अशी अपेक्षा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केली.
येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात रामराजे बोलत होते. व्यासपीठावर आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, शिक्षण सभापती राजेश पवार, निरंतरचे शिक्षणाधिकारी अण्णासाहेब मगदूम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुरस्कारप्राप्त शिक्षकांना मार्गदर्शन करताना रामराजे म्हणाले, ‘जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पटाची निर्मिती करा. ज्या शाळांना डिजिटल व्हायचे आहे, त्यांच्यासाठी हे माजी विद्यार्थी मदत करतील. त्यांच्या मदतीचा वाटा छोटा असला तरीही त्यातून मोठं काम उभं राहू शकतं. विपरित परिस्थितीत विद्यार्थ्यांना घडविण्याचं काम करणाऱ्या जिल्हा परिषदेतील प्रत्येक शिक्षक आदर्श पुरस्काराचा मानकरी आहे. पालकांपेक्षाही शिक्षकांबरोबर विद्यार्थी जास्तवेळ असतो. म्हणूनच विद्यार्थ्यांचा कल तपासून त्यांना घडविण्यासाठी शिक्षकांनी स्वत:ला सिद्ध करणं गरजेचं बनलं आहे. विद्यार्थ्यांच्यातील गुणवत्ता आणि आत्मविश्वास यांच्यातील दरी संपुष्टात आणण्यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे.’
आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, ‘जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्यांचा विषय खूपच गाजला. नोकरी म्हटल्यावर बदली गृहित आहे, तरीही या बदलीपायी अवघं कुटुंब विखरून जाणं क्लेशदायक आहे. या प्रक्रियेचा काही भाग आता जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येत आहे. त्यामुळे दोन शिंदे यांनी मिळून शिक्षकांच्या हिताचा निर्णय घेऊ.’
यावेळी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत समाविष्ट असलेले शहरी व ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.महिला व बाल विकास समिती सभापती वनिता गोरे, समाज कल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, सदस्य मानसिंगराव जगदाळे, सुरेंद्र गुदगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.सातारा येथे आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम दीपप्रज्वलन करताना रामराजे नाईक-निंबाळकर, यावेळी राजेश क्षीरसागर, कैलास शिंदे, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, संजीवराजे नाईक-निंबाळकर आदी.