शिरवळ प्रतिनीधीः मुराद पटेल खंडाळा तालुकयातील धनगरवाडी गावच्या हद्दीतील मोटे वस्तीजवळ दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या माजी तालुकाध्यक्षाचा तलवारीने सपासप वार करुन खून करण्यात आला आहे. मयुर कृष्णा शिवतरे (वय २९ रा.धनगरवाडी ता.खंडाळा) असे खून झालेल्या युवा मोर्चाच्या माजी पदाधिका-यांचे नाव आहे.
याबाबतची घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, धनगरवाडी ता.खंडाळा येथे हायवेलगत मोटेवस्ती आहे.याठिकाणी खंडाळा पंचायत समितीचे विदयमान सभापती मकरंद उर्फ मारुती मोटे हे कुंटूबियासह वास्तव्यास आहे.दरम्यान,सोमवार दि.25 नोव्हेंबर रोजी मकरंद मोटे यांचा मुलगा अनिकेत व मयुर शिवतरे यांच्यामध्ये दुरध्वनीद्वारे शाब्दिक चकमक उडाली होती. यावेळी राञी दहा वाजण्याच्या सुमारास मयुर शिवतरे हा काही लोकांसमवेत मोटे वस्ती याठिकाणी याबाबत विचारणा करायला गेला असता त्याठिकाणी दोन गटांमध्ये जोरदार वादावादी होत तुंबळ हाणामारी झाली.यावेळी झालेल्या मारामारीमध्ये तलवारीसह घातक शस्ञांचा वापर झाल्याने व तलवारीने मयुर शिवतरेवर सहा ते सात वार झाल्याने मयुर शिवतरे हा गंभीर जखमी झाला तर रवि मोटे व योगेश मोटे हे गंभीर जखमी झाले. यावेळी घटनेची माहिती मिळताच शिरवळ ,खंडाळा,लोणंद पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.यावेळी पोलीसांनी गंभीर जखमी झालेल्या मयुर शिवतरे याला शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मयुर शिवतरे याचा मृत्यू झाला.
दरम्यान,याप्रकरणी शिरवळ पोलीसांनी सभापती मकरंद मोटे यांच्यासह पाच जणांना ताब्यात घेत अटक केली आहे.याप्रकरणी शिरवळ पोलीस स्टेशनला परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावेळी सातारा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते , अपर पोलीस अधिक्षक धिरज पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश हजारे यांनी भेट दिली असून घटनास्थळी पोलीसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे.