कोरेगाव : शेती उत्पन्न बाजार समितीवर पूर्ण ताकदीनिशी सत्तेवर येण्याचे राष्ट्रवादीचे स्वप्न दिवसेंदिवस अवघड होत चालले असल्याचे दिसू लागले आहे. तीन विधानसभा मतदारसंघांत विभागलेल्या या तालुक्यातील विभागवार तिकीट वाटपात झालेला अन्याय आणि नाराजांची वाढती संख्या पक्षासाठी डोकेदुखी ठरली आहे. उत्तर भागाला दिलेले प्राधान्य हे पक्षासाठी नुकसानकारक ठरणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. कोरेगाव तालुका हा कोरेगाव, फलटण राखीव व कऱ्हाड उत्तर या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागला जात आहे. जिल्हा परिषदेसाठी कोरेगाव, कुमठे, एकंबे, वाठार किरोली, सातारारोड, वाठार स्टेशन व पिंपोडे बुद्रुक असे सात गट असून, या गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विविध संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली जात असल्याचा आजवरचा पक्षाचा अनुभव होता. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, आ. दीपक चव्हाण, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील खत्री यांच्या चर्चेतून उमेदवारीबाबत निर्णय घेतले जात होते. मात्र, बाजार समितीसाठी जिल्हा परिषद गट निकष हा पायदळी तुडविण्यात आल्याने विभागीय समीकरणे चुकली आणि इच्छुकांची वाढती संख्या थोपविण्यात आलेले अपयश हे पक्षासाठी नुकसानकारक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पणन मतदारसंघातून तानाजीराव शिंदे (चौधरवाडी) यांची बिनविरोध निवड झाली आहे. ते पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद गटातील आहेत. याच गटातील बाळासाहेब सोळस्कर-पाटील (सोळशी), बाळासाहेब भोईटे (सर्कलवाडी), गुलाबराव जगताप (रणदुल्लाबाद), जयेंद्र लेंभे (पिंपोडे बुद्रुक) यांना संधी देण्यात आली आहे.तसेच वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटामध्ये अजय कदम, शांताराम दोरके, तुळशीदास वेळेकर व शकिला पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोन गटांत १९ पैकी ९ उमेदवार आहेत. उर्वरित जिल्हा परिषद गटांमध्ये कोरेगाव गटात प्रीतम शहा, संजय बर्गे व प्रताप कुमुकले-निकम हे तिघे, एकंबे गटात विष्णुपंत कणसे व बबन मदने हे दोघे, वाठार किरोली गटात काकासाहेब गायकवाड, संतोष जगताप व कुसूम कदम या तिघांना तर कुमठे गटात विठ्ठल पवार व सातारारोड गटात दत्तात्रय कदम या प्रत्येकी एकाला संधी देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)काँग्रेसचा नेटका प्रचार काँग्रेस पक्षाने बाजार समिती निवडणुकीकडे चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी विभागवार समसमान प्रतिनिधीत्व दिले आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्याबरोबरच त्यांनी पक्ष संघटन विचारात घेऊन प्रचारास सुरुवात केली आहे. त्यांचे नेटके नियोजन व प्रचार चांगलाच फायद्यात ठरणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीतील सुंदोपसंदी त्यांना आयतीच फलदायी ठरण्याची शक्यता आहे.
कोरेगाव बाजार समितीचा गड राष्ट्रवादीला अवघड
By admin | Published: July 29, 2015 9:53 PM