दुर्ग सातारा जिल्ह्यातील हा समूह जिल्ह्यातील विविध २४ गडकोटांवर संवर्धनाचे काम करणाऱ्या दुर्ग संस्थांनी एकत्र येत दोन वर्षांपूर्वी स्थापन केला आहे. रविवारी विविध दुर्ग संस्थांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत सदाशिवगडावरील रस्त्यास विरोध करण्यात आला.
किल्ले सदाशिवगडावर आजही लहान मुलांसह अण्णा जोशी, गोपाळदास देवी यांच्यासारखे ८० वर्षांहून अधिक वयाचे लोक दररोज गडावर पायरी मार्गाने अथवा बाबरमाची, वनवासमाची मार्गे गडावर येतात. त्यामुळे दर्शनासाठी वयोवृद्धांना गडावर येता येत नाही, हा दावा हास्यास्पद असाच आहे. गड परिसरात वनविभागाची हद्द आहे. यापूर्वी एक ते दोन वेळा परिसरात बिबट्याचे दर्शन झाले आहे. सदाशिवगड ते सांगली जिल्ह्यातील किल्ले मच्छींद्रगड अशी सह्याद्रीची डोंगर रांग असून पुढे सागरेश्वर अभयारण्य आहे. हरिण, काळवीट यासारखे वन्यप्राणी सदाशिवगड परिसरात त्यामुळे पाहावयास मिळतात. विपुल वनसंपदा असून पर्यावरण रक्षणासाठी रस्ता धोका ठरणार आहे. रस्ता झाल्यास गडावर अनावश्यक गोष्टींना आवर घालणे अशक्य होणार आहे. रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावी लागणार आहे. त्याचबरोबर उत्खननही करावे लागणार आहे. बुलडोझर तसेच सुरूंग वापरून खडक फोडण्याचा प्रयत्न झाल्यास गडावरील मंदिर तसेच तटबंदीला धोका निर्माण होणार आहे. गडकोटांचे महत्त्व दुर्गमतेत असून ही दुर्गमता रस्ते करून नष्ट केली जात आहे. रस्त्यामुळे गडाचे गडपण हरवणार असून पुस्तकात दाखवण्यासाठी किल्ले शिल्लक राहणार नाहीत.
राज्य शासनाने रस्त्याचा प्रस्ताव त्वरित रद्द करावा. या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास प्रसंगी आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.