परळी : सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा म्हणून सज्जनगड हा किल्ला ओळखला जातो. आजदेखील इतिहासाच्या पाऊलखुणा याठिकाणी पाहायला मिळतात. मात्र, शहरातील दररोजच्या आयुष्याला कंटाळून निसर्गाच्या सानिध्यात पार्टी करण्याच्या मानसिकतेमुळे सज्जनगड परिसर (पायरी मार्ग) मद्यपींचा अड्डाच बनत आहे. त्यामुळे राजरोसपणे वावरही वाढत चालला आहे. पोलिसांनी सज्जनगडसारख्या पवित्र अशा ठिकाणी मद्यप्राशन केले जाणार नाही, याची दक्षता घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी परळी खोऱ्यातील दुर्गप्रेमींमधून होत आहे.
परळी खोऱ्यातील निसर्ग संपदेमुळे शहरातील रटाळ आयुष्य जगणारे नागरिक हे या भागात फिरण्यास तसेच पार्टीच्या नियोजनानेच दाखल होत असतात. मात्र, निसर्गाचा आनंद घेत असताना ऐतिहासिक जागेचे भानही विसरत असल्याने मद्यपींचा धिंगाणा स्थानिकांना डोकेदुखी ठरत आहे. तसेच पोलिसांनी उरमोडी धरण परिसर, सज्जनगड पायरी मार्ग अशा ठिकाणी गस्त घालून ऐतिहासिक वास्तूची अवहेलना होणार नाही, याची काळजी घेण्याची विनंती परळी खोऱ्यातील दुर्गप्रेमी तसेच स्थानिक नागरिक करत आहेत. सज्जनगडावर स्थानिकांसह संपूर्ण राज्यातून येणाऱ्या भाविक-भक्तांसह पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या परिसरात मद्यपान करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मार्गावर तसेच परिसरातील अनेक निवांत ठिकाणी बाटल्यांच्या खच पाहायला मिळत आहे. काहीजण यथेच्छ दारू ढोसून परत निघताना बाटल्या तशाच सोडून न जाता फोडत आहेत, त्याचा त्रास इतरांना होऊ शकतो, याचे भानही या मद्यपींना नाही. अशा घटनांमुळे एखाद्याच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे पोलिसांनी सज्जनगडासह परिसरातील वातावरण दूषित करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
(चौकट..)
पार्टी बहाद्दरांमुळे पायरी मार्ग परिसरात बाटल्यांचा खच
सज्जनगड पायरी मार्ग हा तसा कमी वर्दळीचा अन् निवांत, त्यामुळे मित्रमंडळी गोळा करून शहरातून मद्य घेऊन या परिसरात पार्टी करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच मद्यप्राशन करून बाटल्या इतरत्र टाकणे तसेच खाण्यासाठी आणलेल्या खाद्यपदार्थांचे कागदही तसेच टाकले जात असल्याने परिसरात बाटल्या अन् कचरा दिसून येत आहे.
१८परळी
किल्ले सज्जनगड (ता. सातारा) परिसरात मद्यपींचा वावर वाढल्याने अनेक ठिकाणी बाटल्यांचा खच पडलेला पाहायला मिळत आहे. (छाया : अक्षय सोनटक्के)