ऑनलाईन लोकमत
सातारा, दि. 25 - राज्यात तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सातारा शहरातील तापमान शनिवारी 39 अंश सेल्सिअस असले तरी इतर भागातील तापमानाने चाळीशी गाठली होती. त्यामुळे आगामी काळात तीव्र उन्हाळा राहणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच थंडी गायब झाली आणि उन्हाळ्याला ख-याअर्थाने सुरुवात झाली होती. त्यामुळे यावर्षीचा उन्हाळाही २०१६ प्रमाणेच कडक असणार, असे अंदाज बांधले जात होते. त्याप्रमाणेच सध्यातरी उन्हाळा सुरू असल्याचे दिसत आहे. कारण, गेल्या काही दिवसांत तापमानात सतत वाढ होत आहे. गेल्या १५ दिवसांपासून तर तापमान ३५ अंशाच्या पुढे आहे. शनिवारी तापमान या वर्षातील सर्वात अधिक ठरले आहे.
शनिवारी सातारा शहरातील तापमानाने ३९ अंशापर्यंत मजल मारली होती. त्यामुळे उकाडा जाणवत होता. नागरिक घरात बसून होते. अनेकांनी बागेत, झाडाच्या सावलीला थांबणे पसंत केले होते. असे असताना पूर्वेकडे मात्र तापमानाने चाळीशी गाठली होती. सर्वत्र उन्हाच्या झळा जाणवत होत्या. (प्रतिनिधी)