खंडाळा : वीज महावितरणकडून वीज ग्राहकांचे कनेक्शन थकीत वसुलीसाठी तोडले केले जात असताना, खंडाळा तालुक्यातील शिवाजीनगर ग्रामपंचायतीने महावितरणला तब्बल चाळीस लाखांचा झटका दिला आहे. गावठाणामध्ये, तसेच शेतजमिनीमध्ये कोणाची परवानगी घेऊन विजेचे खांब व टॉवर उभे केले, असा प्रश्न विचारण्यात आला आहे. संबंधित यंत्रणा उभी करण्यासाठी कोणती कागदपत्रे सादर करण्यात आली, याचीही माहिती ग्रामपंचायतीने महावितरणकडून मागविली असून, तसा ठराव करण्यात आला आहे.
शिवाजीनगर ग्रामपंचायतीने महावितरणच्या विरोधात मासिक सभेत ठराव घेतला आहे. शिवाजीनगर येथे सोळा वर्षांपासून महावितरण कंपनीने गावातील लोकांना वीज कनेक्शन देऊन आपल्या गावांमध्ये व्यवसाय सुरू केला आहे. गावांमध्ये गावठाण हद्दीत व शेत जमिनीमध्ये विनापरवाना कोणताही मोबदला न देता, विजेचे खांब, उच्च दाब प्रवाहाचे टॉवर उभे केले आहेत. त्यासाठी कंपनीने गावठाण व शेत जमिनीमधील जागेचा वापर केला आहे. मात्र, याची ग्रामपंचायतीकडून कोणतीही परवानगी घेतलेली नाही. जर अशी परवानगी घेतली असल्यास ग्रामपंचायतीला कागदपत्रे सादर करावी. गावांमध्ये ही कंपनी व्यवसाय करून नफा मिळवत आहे. ग्रामपंचायतीने महावितरण इलेक्ट्रिक थांब, डी.पी., उच्चदाब वाहिनी टॉवर कायदेशीर मार्गाने कर आकारणी करावी आणि सोळा वर्षांपासून आजपर्यंतची कायदेशीर मार्गाने वसुली करण्यात यावी, तसेच ग्रामपंचायतीचा कर वसूल झाल्यानंतरच पथदिवे बिल महावितरण कंपनीकडे अदा करण्यात यावे. महावितरणने बिल न दिल्यास त्यांच्याविरुद्ध कोर्टात कायदेशीर दावा दाखल करण्यात यावा व रक्कम वसूल करण्यात यावी. या संदर्भात मासिक सभेमध्ये ठराव करण्यात आला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीने महावितरण विरोधात धाडसी निर्णय घेतल्यामुळे तालुक्यातील इतर ग्रामपंचायती असे निर्णय घेणार का, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
चौकट..
महावितरणसाठी लागू केलेले कर...
वीज पोल संख्या १२०, १ वर्षाची आकारणी १ लाख २० हजार, १६ वर्षांची आकारणी १९ लाख २० हजार, डी.पी. संख्या ३, १ वर्षाची आकारणी १५ हजार, १६ वर्षांची आकारणी २ लाख ४० हजार, उच्चदाब वाहिनी टॉवर संख्या २०, १ वर्षाची आकारणी १ लाख २० हजार, १६ वर्षांची आकारणी १९ लाख २० हजार असे एकूण चाळीस लाख रुपये कर ग्रामपंचायतीकडे भरण्याची नोटीस खंडाळा यथील वीज वितरण कार्यालयाला देण्यात आली आहे.
(कोट..)
वीज मंडळाने गावातील रस्त्यांवरची लाइट बंद केली आहे. ग्रामपंचायती थकीत बिले भरण्यासाठी सक्षम नाहीत. वीज मंडळ गावच्याच जागेचा वापर करून व्यवसाय करीत आहे. मग त्याचा कर का भरत नाही, यासाठी ठराव घेऊन त्यांना नोटीस बजावली आहे.
- हर्षवर्धन भोसले, सरपंच