सातारा : खंडोबाची पाल (ता. कऱ्हाड) येथे छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मदिनी एका वृद्ध महिलेच्या चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ जुन्या जटा अंधश्रद्धा निर्मूलन समिती व एम. एन. रॉय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने काढून टाकण्यात आल्या. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाल येथील कार्यकर्ते धडपडे व थोरात यांच्या पुढाकाराने जटा निर्मूलन आयोजित करण्यात आले होते. पाल येथील सामाजिक कार्यकर्ते संजय थोरात यांनी संबंधित महिला व तिच्या कुटुंबाची जटा निर्मूलनसाठी मानसिक पूर्वतयारी केली. डॉ. कुंभार व किशोर धडपडे यांनी सविस्तर शंकानिरसन करून या महिलेस जटा निर्मूलनसंबंधी शास्त्रीय माहिती दिली. वाघ्या मुरळी प्रथेच्या विरोधात सामाजिक न्यायाचा कायदा तयार करणाऱ्या शाहू महाराजांच्या स्मृतिस अभिवादन करण्याचा कार्यक्रम जटा निर्मूलन करून करण्यात आला. ९० हून अधिक महिलांच्या जटा यशस्वीपणे सोडवणारे डॉ. सुधीर कुंभार यांच्या तज्ज्ञ नेतृत्वाखाली ६२ वर्षे वृद्धेच्या जवळपास ५२ इंच लांबीच्या जटा सोडविण्यात आल्या. या वृद्धेस जटांमुळे झोपण्यास समस्या होती. तसेच मानदुखी व अंग हात थरथरणे अशा जटांशी संबंधित आरोग्याच्या तक्रारी होत्या. सुमारे चार तास अथक प्रयत्नांनी डॉ. सुधीर कुंभार, प्रा. ओहोळ व एम. एन. रॉय अनौपचारिक शिक्षण व संशोधन संस्थेचे कार्यकर्ते सुहास पाटील तसेच ‘अंनिस’चे किशोर धडपडे यांनी जटा सोडविल्या. गावातील तीन विद्यार्थिनी जटानिर्मूलन कार्यक्रमात सहभागी झाल्या. डॉ. गोविंद धस्के व अनामिका धस्के या संशोधकांनी या जटा निर्मूलन कार्यक्रमाचे शास्त्रीय पद्धतीने छायाचित्रीकरण करून जटानिर्मूलन प्रशिक्षण कार्यक्रमासाठी हातभार लावला. जटा निर्मूलन केल्याबद्दल डॉ. कुंभार व इतर कार्यकर्त्यांचा पाल गावातील वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणाऱ्या नागरिकांतर्फे सत्कार करण्यात आल्याची माहिती अंनिसचे प्रधान सचिव प्रशांत पोतदार यांनी दिली. (प्रतिनिधी) पाल, ता. कऱ्हाड येथे वृद्धेचे जटानिर्मूलन करताना डॉ. सुधीर कुंभार व इतर.
चाळीस वर्षांची जटा काढायला लागले चार तास!
By admin | Published: June 30, 2016 10:57 PM