आॅनलाईन लोकमतसणबूर (जि. सातारा), दि. १९ : बिचकरवाडी, ता. पाटण येथील वांग नदीच्या काठावर झुडपामध्ये बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थ शोध घेत असताना जिंती-मोडकवाडी येथील आनंदा सोनके यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी सोनके यांचा मृतदेह तपासणीसाठी कऱ्हाड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. मंगळवारी सायंकाळी पुराच्या पाण्यातून एकजण वाहून गेल्याची घटना ढेबेवाडी विभागात घडली होती. मोडकवाडी येथील आनंदा सोनके व रामचंद्र मोडक हे मंगळवारी दुपारच्यावेळी ढेबेवाडी येथे बाजार आणण्यासाठी गेले होते. बाजार आटोपून दोघेही पायी चालत मोडकवाडी निघाले. सायंकाळी ते जिंती-मोडकवाडी रस्त्यावर असलेल्या वांग नदीच्या पुलावर पोहोचले. संबंधित पुलावरून सध्या नदीच्या पुराचे पाणी वाहत आहे. अशातच आनंदा सोनके व रामचंद्र मोडक यांनी पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. दोघेही चालत निघाले असताना आनंदा सोनके यांचा पाय पुलाच्या रस्त्यावर पडलेल्या भगदाडात अडकला. रामचंद्र मोडक यांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, अचानक पाण्याचा मोठा लोट आल्याने आनंदा सोनके पुराच्या पाण्यात वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच जिंती व मोडकवाडीतील ग्रामस्थ त्याठिकाणी जमा झाले. तसेच दुर्घटनेची माहिती प्रशासनाला देण्यात आली. वांग नदीपात्रात रात्री उशिरापर्यंत बेपत्ता आनंदा सोनके यांचा शोध घेतला जात होता. अखेर आनंदा सोनके यांचा बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वांग नदीच्या काठावर बिचकरवाडी येथे एका झुडपात मृतदेह आढळला.
बिचकरवाडी येथे आढळला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 4:05 PM