सातारा : सार्वजनिक ठिकाणी परवाना नसताना दारू पिणे चौघांच्या चांगलेच अंगलट आले असनू, याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर दारू बंदी अधिनियमानुसार ८५ (१) गुन्हा दाखल केला आहे. यातील तीन घटना दहिवडी येथे तर एक घटना फलटण येथे घडली आहे.भाडळी, ता. फलटण गावच्या हद्दीतील जाणाऱ्या रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी हणमंत बबन गोरे (वय ४०, रा. अर्धपित्री, ता. गेवराई, जि. बीड) हे दारू पित बसले होते. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलिस काॅन्स्टेबल रामदास पठाडे हे गस्त घालत असताना गोरे हे त्यांना दारू पित असताना सापडले. त्यांच्याकडे दारू पिण्याचा परवाना आहे का, अशी विचारणा पोलिसांनी त्यांच्याकडे केली. मात्र, त्यांच्याकडे परवाना नव्हता. त्यामुळे त्यांच्यावर फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.दुसरी घटना दहिवडीतील फलटण चाैकात सार्वजनिक ठिकाणी घडली. या रस्त्यावरून रमेश मेथूर ठाकूर (वय ३५, रा. दहिवडी, ता. माण, जि. सातारा) हा वाकडा-तिकडा चालत होता. पोलिसांनी त्याच्याकडे परवाना मागितला असता त्याच्याजवळ परवाना नसल्याचे समोर आले. तसेच ब्रेथ अॅनालायझर मशीनमध्ये त्याला फुंकर मारण्यास सांगितले. त्याने फुंकर मारल्याने मशीनमध्ये रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे त्याच्यावर दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याच चाैकात आणखी एक व्यक्ती रस्त्यावरून वाकडा-तिकडा चालताना दिसून आला. त्याचे नाव पोलिसांनी विचारले असता त्याने गणेश महादेव योगे (वय ३३, रा. मार्डी चाैक, दहिवडी, ता. माण, जि. सातारा) असे नाव सांगितले. त्याचाही अहवाल ब्रेथ अॅनालाझरमध्ये पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे त्याच्यावरही दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून दखल घेण्यास सुरुवातसार्वजनिक दारू ठिकाणी दारू पिताना कोणी आढळून आल्यास पोलिस यापूर्वी कानाडोळा करत होते. परंतु आता पोलिसांकडून अशा मद्यपींवर थेट गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे मद्यपींची चांगलीच तंतरली आहे.
Satara Crime: दारू पिण्याचा परवाना नसणे चौघांना भोवले, तिघांवर गुन्हा दाखल
By दत्ता यादव | Published: March 15, 2023 6:50 PM