सातारा : मोबाईल टॉवरच्या नावाखाली साताऱ्यातील एका सेवानिवृत्ताची १२ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. आता पोलीस संबंधितांचा शोध घेत आहेत. दरम्यान, गुगल पे वरून ही सर्व रक्कम संबंधितांच्या बँक खात्यावर वर्ग झाली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,अरुण जयसिंगराव देशमुख (वय ६५, रा. गडकर आळी, सातारा) यांची टॉवर बांधकामाच्या नावाखाली फसवणूक झाली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार देशमुख यांच्या वाचनात एक जाहिरात आली होती. त्यातील नंबरवरून देशमुख यांनी फोन केला असता समोरून प्रथम गौरव शर्मा नावाची व्यक्ती बोलली. त्यावेळी त्याने ‘प्रवेश शुल्क १ हजार ३५० असून, टॉवरचे वकील विजय मुंडा यांच्या बँक खात्यावर ते पाठवा,’ असे सांगितले. त्यानंतर त्याने रांचीतील एका बँकेतील खाते क्रमांक दिला. त्यानुसार देशमुख यांनी १७ जुलै रोजी प्रथम १ हजार ४०० रुपये बँक खात्यात पाठविले. त्यानंतर शर्माने ‘आम्ही उपग्रहाच्या आधारे तुमच्या ठिकाणाची तपासणी केली असून, तेथे टॉवर बसविणे योग्य आहे. तसेच त्याला कंपनीकडूनही मान्यता मिळालीय. आता करार करण्यासाठी २६ हजार ८०० रुपये खात्यावर जमा करावे लागतील,’ असे सांगितले. त्यानंतर अशाच प्रकारे बँक कमिशन, कागदपत्रे, गाडीसाठी डिझेल, चालक खर्च, मॅनेजर कमिशन, पोलिसांनी गाडी पकडली, गाडीचे टायर फुटले, चालकाचा जेवणाचा खर्च, कर भरणे आदी विविध कारणे सांगून १२ लाख ४८ हजार ४०० रुपये खात्यावर घेतले. हे पैसे गुगल पे वरून पाठविण्यात आले. त्यानंतरही मोबाईल टॉवरसाठी साहित्य किंवा करारही देशमुख यांना मिळाला नाही.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने अरुण देशमुख यांनी गौरव शर्मा, अॅड. विजय मुंडा आणि संजय बन्सल (पत्ता नाही) यांच्याविरोधात १२ लाख ४८ हजार ४०० रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद करून शोध सुरू केला आहे....................................................