सातारा : सातारा शहर परिसरातील अजिंक्यतारा किल्ला, यवतेश्वर व सोनगाव परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असून, त्यांची संख्या चारपर्यंत आहे. त्यामध्ये एक नर, मादी आणि दोन पिल्लांचा समावेश आहे. सतत भटकंती सुरू असल्याने या बिबट्यांना पकडण्यासाठी गोडोलीतील गोळीबार मैदानाजवळील टेकडीच्या पायथ्याला पिंजरा लावण्यात आला आहे.
गेल्या एक महिन्यापूर्वी सातारा शहराचे उपगनर असणाऱ्या शाहूपुरीत बिबट्या घुसला होता. त्यामुळे खळबळ उडाली होती. वन विभागासह नागरिकांनी परिसर पिंजून काढला होता. त्यानंतर बिबट्याने यवतेश्वरच्या डोंगराकडे पलायन केले. सातारा शहर व परिसरात वारंवार बिबट्या दिसून येऊ लागला आहे. याचे कारण, म्हणजे लोकांनी त्यांच्या अधिवासात केलेला प्रवेश हेच आहे. तसेच बिबट्याचे आवडते खाद्य हे कुत्रा आहे. त्यामुळे कुत्र्याच्या शोधात बिबट्या शेवटी मानवी वस्तीपर्यंत पोहोचत आहे.
चार दिवसांपूर्वी येथील माची पेठेत बिबटोबाचे दर्शन झाले. त्यानंतर तो त्याच परिसरात दिसून आला. माची पेठ परिसरात आढळलेला बिबट्या हा पिल्लू असून, ते साधारणपणे एक वर्षाचे असल्याचे समोर आले आहे. तर गेल्या एक महिन्यापासून गोडोली भागातील डोंगरभागात एक मादी आणि दोन पिल्लांचे दर्शन होत आहे. त्यासाठी गेल्या सहा दिवसांपासून गोळीबार मैदानाजवळील टेकडीच्या पायथ्याला पिंजरा लावण्यात आला आहे. पिंजºयात कुत्र्याला ठेवण्यात आले आहे. मात्र, अद्यापही या पिंजºयाकडे एकही बिबटोबा वळलेला नाही. माची पेठेत दिसून आलेला बिबट्या हा त्या मादीचेच पिल्लू असण्याची शक्यताही वन विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे.बिबट्याचे ठसे आढळून आले...साताºयातील माची पेठेत बिबट्या दिसून आला. त्यानंतर वन विभागाच्या पाहणीदरम्यान बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे वन विभागाने शाहूनगर, शाहूपुरी, माची पेठेतील नागरिकांत जागृती केली. बिबट्यापासून सुरक्षित राहण्यासाठी काय करावे, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच वनविभागाकडून सतत अजिंक्यतारा किल्ला परिसरात जाऊन बिबट्याचा शोध घेण्यात येत आहे.