सागर गुजर
सातारा : जिल्ह्यातील अजिंक्यतारा, बाळासाहेब देसाई, सह्याद्री, रयत (अथणी शुगर) या चार कारखान्यांनी चालू हंगामामध्ये गाळप केलेल्या उसाच्या एफआरपीची रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. मात्र काही कारखान्यांनी ऊस गाळप करून देखील निम्मी रक्कमही दिलेली नाही.
साखर आयुक्त कार्यालयाच्यावतीने चालू हंगामातील एफआरपीबाबतचा अहवाल जाहीर केला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सहकारी व खासगी असे एकूण १२ कारखाने सुरू आहेत. सर्व कारखाने पूर्ण क्षमतेने उसाचे गाळप करत आहेत. काही कारखाने बंद असल्यामुळे त्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस देखील गाळपासाठी सुरू असलेले कारखाने नेत आहेत.
साखर आयुक्तांनी नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सातारा जिल्ह्यातील चार कारखान्यांनी एफआरपीची रक्कम पूर्ण दिली आहे. जयवंत शुगर या कारखान्याने जाहीर केलेल्या एफआरपीपेक्षा ९५.३९ टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. कृष्णा कारखान्याने देखील ८१.६१ टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिलेली आहे.
फलटण येथील शरयू कारखान्याने मात्र केवळ ३९.१२ टक्के इतकी कमी रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. माण-खटाव, स्वराज या कारखान्यांनी १५ जानेवारीपर्यंत तरी एफआरपीची रक्कम दिलेली नव्हती. दत्त इंडिया साखरवाडी या कारखान्याने ६८.५२ टक्के, गोपूज येथील ग्रीन पॉवरने ६९.१४ टक्के, जरंडेश्वर शुगरने ५९.११ टक्के इतकी एफआरपीची रक्कम दिलेली आहे. जिल्ह्यातील एकाही कारखान्याने एफआरपीच्या व्यतिरिक्त रुपयाही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेला नाही.
उशिरा ऊस जातो म्हणून घाबरू नका
शेतामध्ये ऊस उभा राहिला तर त्याचे टनेज घटेल, अशी शेतकऱ्यांना भीती आहे. शेतकऱ्याने ही भीती मनातून काढून टाकली पाहिजे. ऊस उशिरा गेला तरी काही फरक पडत नाही, पण जो कारखाना चांगला दर देत आहे, त्याच कारखान्याला ऊस घातला, तर शेतकऱ्याला खर्च वजा जाता हाती काही पैसा पडू शकतो.