दहिवडी : ‘सुंदर माझे कार्यालय’ या मोहिमेंतर्गत दहिवडी येथे प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी वृक्षारोपण करुन तब्बल चार तास श्रमदान केले. कृषी दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला.
यानिमित्ताने दहिवडीचे प्रांतधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्यासह खटावचे प्रांताधिकारी कासार, पाणी फाउंडेशनचे पश्चिम विभागाचे समन्वयक आबा लाड, तालुका समन्वयक अजित पवार, संजय साबळे, महसूल विभाग नगरपंचायतीचे कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रांत कार्यालयासमोर आंबा, चिंच, जांभूळ यांचे वृक्षारोपण करण्यात आले. सूर्यवंशी यांनी हातात फावडे घेऊन चार तास घाम गाळला. झाडे लावून पाण्यासह त्याला कंपाऊंडही केले.
सुंदर माझे कार्यालय अंतर्गत प्रत्येक कर्मचाऱ्याने एक झाड जगवायचे असा निर्णयही घेण्यात आला. तालुक्यातील कोणतेही सरकारी कार्यालय असो ते घरासारखे वाटले पाहिजे. कार्यालयात आलेल्या लोकांना विश्रांती घेता यावी. थोडा विरंगुळा मिळावा यासाठी प्रत्येक कार्यालयासमोर वृक्षारोपण व्हावे व ती झाडे वाढवण्याची जबाबदारी त्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी घ्यावी असे नियोजनही देण्यात आले. प्रांताधिकारी कार्यालय हे दहिवडीच्या मध्यभागी आहे, ते सुंदर असे व्हावे तसेच नानानानी पार्क व्हावा यासाठी छोटीशी संकल्पनाही मांडण्यात आली.
चौकट
माण तालुक्यात वृक्ष व फळबाग लागवडीला मोठा वाव आहे. अनेक दिवस आपण कोरोनाशी सामना करतोय त्यामुळे लोकांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. ते विसरुन पुन्हा समृद्ध गावासाठी वृक्षारोपणाची मोहीम हाती घेऊन माण तालुका हिरवागार करणार आहे, असा संकल्प प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी केला.
फोटो ०२दहिवडी
दहिवडी येथे कृषी दिनाचे औचित्य साधून प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, खटावचे कासार, पाणी फाउंडेशनचे आबा लाड, अजित पवार, संजय साबळे यांनी वृक्षारोपण केले.