खटाव : खटावच्या कोरोना सेंटरमध्ये नियंत्रण कक्षाच्या दुर्लक्षामुळे कोरोना चाचणीसाठी अक्षरशः कर्मचारी व लोकांना तीन-चार तास उन्हामध्ये थांबावे लागत आहे. यामुळे सोबत आलेले मुलांसह वृद्धांचे हाल होत आहेत. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा संपूर्ण फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.
खटाव येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहामध्ये सुरू असलेल्या कोरोना सेंटरमध्ये तपासणीकरिता नागरिक येत आहेत. परंतु गर्दी वाढत असल्यामुळे सुविधाअभावी नागरिकांना हाल सहन करावे लागत आहेत. प्रशासनाने गांधारीची भूमिका घेतली आहे. कोरोना हद्दपार करण्यासाठी की कोरोना वाढविण्यासाठी हे सेंटर सुरू केले आहे? असा सवाल तपासणीसाठी आलेल्या लोकांमधून व्यक्त होत आहे.
या सेंटरमध्ये पाच डॉक्टर, सात परिचारिका, एक प्रयोगशाळा तंत्रज्ज्ञ, एक डाटा ऑपरेटर व चार वार्डबॉय असे आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र कोरोना चाचणी परीक्षणासाठी रॅपिड टेस्ट व आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी तीन ते चार कर्मचारी लागत असतात. मात्र, खटावच्या सेंटरमध्ये एकच प्रयोगशाळा तंत्रज्ञ आरोग्य कर्मचारी नेमल्याने तपासणीचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे.
तपासणी चाचणी इमारतीमध्ये सावलीच्या ठिकाणी करण्याऐवजी बाहेर मोटरसायकल स्टॅन्डमध्ये अर्धवट उन्हामध्ये सुरू ठेवल्याने नागरिकांचे हाल होताना दिसून येत आहेत. तरी तपासणीसाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून सावलीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळून तपासणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
चौकट ;
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तहसीलदारांनी मंडप घालण्याच्या सूचना केल्या आहेत. होमगार्डसोबत एक पोलीस कर्मचारी पूर्णवेळ ठेवण्याची मागणी केली आहे.
- डॉ. युनूस शेख, तालुका वैद्यकीय अधिकारी, खटाव
कोट :
तपासणीकरिता होत असलेल्या गर्दीमुळे यंत्रणेवर ताण येत आहे. आतमध्ये गर्दी होऊ नये म्हणून बाहेर कोरोनाची चाचणी केली जात आहे. त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये याकरिता मंडप घालून दिला जाणार आहे.
नंदकुमार वायदंडे, सरपंच, खटाव
फोटो नम्रता भोसले यांनी मेल केला आहे.
खटाव येथील कोरोना सेंटरमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. (छाया : नम्रता भोसले)