लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत धान्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केला आहे. या निर्णयानुसार सातारा जिल्ह्यातील ४ लाख १०३ हजार ३८४ कुटुंबांतील १८ लाख ८ हजार ५९१ लोकांना मोफत धान्याचा लाभ मिळणार आहे.
दारिद्र्यरेषेखालील लोकांना मोफत धान्य देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. १४ एप्रिल ते १ मे या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली आहे. या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांश सेवा बंद राहणार असल्याने हातावर पोट असणाऱ्या दारिद्र्यरेषेखालील लोकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. यापैकी अनेक जण दोन वेळच्या अन्नाला वंचित राहू शकतात, हे लक्षात घेऊन राज्य सरकारने रेशनिंगवर मोफत गहू आणि तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्याप किती धान्य मोफत दिले जाणार आहे, याबाबतचा आदेश जिल्हा प्रशासनाला अद्याप प्राप्त झालेला नाही, तरीदेखील किती लोकांना धान्य देता येईल, याची इत्थंभूत माहिती जिल्हा पुरवठा विभागातर्फे तयार ठेवण्यात आलेली आहे. राज्य शासनाचा आदेश आल्यानंतर तसेच धान्य उपलब्ध झाल्यानंतर या धान्याचे वाटप पुढील महिनाभर सुरू ठेवण्यात येणार आहे.
महत्त्वाचे मुद्दे
१) जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील लोकांची संख्या - १८०८५९१
२) तालुकानिहाय संख्या
जावळी : ८२९४४, कऱ्हाड : ३५६३२९, खंडाळा : ६२१६८, खटाव : १८६२८१, कोरेगाव : १३६८४८, महाबळेश्वर : ३५४७०, माण : १४४५०२, पाटण : २२१४७७, फलटण : १९७१९४, सातारा : २७२२३४, वाई : ११३१४४
३) काय मिळणार?
तांदूळ
गहू
प्रतिक्रिया १
कोरोनाचे भले मोठे संकट आपल्यासमोर उभे राहिले आहे. आम्हाला तर रोजचे काम केल्याशिवाय हातात पैसा मिळत नाही. आता कामे थांबल्याने सरकारतर्फे धान्य मिळणार असल्याने दिलासा मिळाला आहे.
- संतोष कुंभार
प्रतिक्रिया २
सरकारतर्फे गहू, तांदूळ मोफत देण्यात येणार आहे, त्याच पद्धतीने साखर, डाळ, तेल अशा वस्तूदेखील रेशनिंगवर द्याव्यात. सवलतीच्या दरात या वस्तू दिल्या तरी चालतील.
- बाळकृष्ण मोरे
प्रतिक्रिया ३
जगण्यापुरते सरकारने धान्य दिले आहे. मात्र बँकांचे आणि पतसंस्थांचे काढलेले कर्ज फेडण्यासाठी पैसे लागतात. सरकारने ही कर्जेदेखील माफ करण्यासाठी निर्णय घ्यावा.
- वसंत धुमाळ