कऱ्हाडातील कार्वे नाक्यापासून कार्वेपर्यंतचा काँक्रीट रस्ता काम पूर्ण झाल्यानंतर एक वर्षातच ठिकठिकाणी उखडला आहे. रस्त्याचे कामही खराब झाले आहे. बांधकाम विभागाने या रस्त्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या अनुषंगाने कऱ्हाड ते तासगाव रस्ता काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. मात्र, कार्वेनाका ते कार्वे यादरम्यान रस्त्याचे काम अतिशय सुमार दर्जाचे झाले आहे. काँक्रीट टाकले आहे; पण ते वर्षभरातच उचकटले आहे. काँक्रिटीकरणाला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. खड्डे पडले आहेत. मोऱ्यांची कामेही वर्षभरानंतरही अपूर्ण आहेत. मोऱ्यानजीक रस्ता झाला नसल्याने वाहनांची आदळआपट होत आहे. कार्वे पुलानजीक काम अपूर्ण आहे. त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. पूर्वी काढलेले नाले तसेच आहेत. यामध्ये नव्या ठेकेदाराने काहीही बदल केलेला नाही. रस्ता दुभाजकाचे बांधकामही पूर्वीचेच आहे. यामध्येही काही बदल करण्यात आलेला नाही. जुन्या कामावर मलमपट्टी करण्यात आली आहे. दुभाजकात झाडेही ठेकेदाराकडून लावण्यात आलेली नाहीत. तसेच दुभाजकाचे ब्लॉक काही ठिकाणी सुटले आहेत. त्यामुळे ब्लॉक रस्त्यावर कोसळून अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागाने रस्त्याच्या कामाची व दर्जाची पाहणी न करता संबंधित ठेकेदाराची बिले कशी अदा केली, असा प्रश्न उपस्थित होत असून, रस्त्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
चौपदरी रस्ता वर्षातच उखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 4:41 AM