मलकापूर : ऊसतोड सुरू असताना बिबट्याची चार बछडे आढळून आली आहेत. चचेगाव (ता. कऱ्हाड) येथील बाराबाईची विहीर नावाच्या शिवारात राहुल पवार यांच्या शेतात बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, त्याच शेतात बिबट्या मादी आणि बछड्यांची पुनर्मिलन करण्यात येणार आहे, अशी माहिती वनाधिकारी ललिता पाटील व आनंदा जगताप यांनी दिली. वनविभागामुळे दोन तासातच बिबट्याची चार पिल्ले आईच्या कुशीत विसावली.चचेगाव (ता. कऱ्हाड) येथे बाराबाईची विहीर नावाच्या शिवारात एका तळावर वीस ते पंचवीस एकर उसाचे क्षेत्र आहे. या परिसरात बिबट्यांचा वावर आहे, हे यापूर्वीच माहीत असल्यामुळे चचेगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून ऊसतोडी राहिल्या होत्या. काही दिवसांपासून भीतीच्या छायेतच ऊसतोडणी सुरू होती. बुधवारी सकाळी राहुल पवार यांच्या शेतात ऊसतोडणी मजूर ऊस तोडण्यासाठी गेले होते. ऊस तोडत असताना सकाळी त्यांना बिबट्याची चार बछडे आढळून आली. यामुळे जवळच कुठेतरी मादी बिबट्या असणार या भीतीने ऊसतोडणी काहीकाळ थांबविण्यात आली. या घटनेची माहिती तत्काळ वन विभागाला देण्यात आली. कऱ्हाड वन विभागाचे वन अधिकारी ललिता पवार व वनक्षेत्रपाल आनंदा जगताप यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित बिबट्याची बछडे ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर बुधवारी संध्याकाळीच बछडे आणि मादी बिबट्याचे पुनर्मिलन घडविण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. मात्र, शेतकरी आक्रमक झाले असून, पुनर्मिलन करण्यासोबत बिबट्याला पिंजरा लावून पकडण्याची मागणी करण्यात येत आहे.बिबट्याला पकडण्यासाठी विशेष परवानगी..वन विभागाच्या बदललेल्या नियमामुळे बिबट्याला पकडण्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागते; परंतु ती परवानगी मिळत नसल्याने केवळ पुनर्मिलन करून त्याच ठिकाणी बिबट्याची बछडे व बिबट्या मादीचे निवासस्थान राहणार आहे. त्यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर पाहायला मिळणार आहे. मात्र, यावरून वन विभागाचे कर्मचारी आणि शेतकऱ्यांत वादावादी होत आहे.
Satara: चचेगावात ऊसतोडणीवेळी बिबट्याची चार बछडे सापडले, वनविभागामुळे दोन तासातच आईच्या कुशीत विसावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 13:33 IST