कऱ्हाड (जि.सातारा) : मराठी बोलता येत नसल्याच्या कारणावरून चौघांनी हॉटेलमध्ये घुसून व्यवस्थापकासह वेटर आणि आचाऱ्याला लोखंडी पाइपने मारहाण केली. बेलवडे हवेली (ता. कऱ्हाड) येथील हॉटेल राजस्थानी येथे रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.याबाबत हॉटेल व्यवस्थापक प्रल्हाद गोबरलाल परमार (मूळ रा. कानेलाव, पो. कुर्णा, ता.जि. पार्ली, राजस्थान) यांनी तळबीड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अविनाश कृष्णात निकम, प्रज्ज्वल तुकाराम निकम, दीपक दत्तात्रय लोकरे, गौरव मधुकर रावते (सर्वजण रा. इंदोली, ता. कऱ्हाड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.बेलवडे हवेली गावच्या हद्दीत असलेले हॉटेल राजस्थानी हे बिरू लुबाराम चौहान यांनी चालविण्यास घेतले आहे. त्याठिकाणी प्रल्हाद परमार हे व्यवस्थापक म्हणून प्रल्हाद बुधाराम कुमार हे वेटर म्हणून तर सुरेश गोबरलाल परमार हे आचारी म्हणून काम पाहतात. दोन दिवसांपूर्वी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हॉटेल बंद करीत असताना चार युवक दुचाकीवरून त्याठिकाणी आले. त्यांनी जेवण आहे का, अशी विचारणा केली. त्यावेळी व्यवस्थापक प्रल्हाद परमार यांनी मला मराठी समजत नाही हिंदीमध्ये बोला, असे सांगितले. त्यावेळी एका युवकाने तू मराठीत बोल नाही तर तुला सोडणार नाही, असे म्हणून हुज्जत घातली. त्यानंतर चौघांनी हॉटेलमध्ये घुसून व्यवस्थापक प्रल्हाद परमार यांना तुम्हाला मस्ती आली आहे, असे म्हणत लोखंडी पाईपने मारहाण केली. त्यामध्ये प्रल्हाद परमार हे गंभीर जखमी झाले. सुरेश परमार आणि प्रल्हाद कुमार हे भांडण सोडवण्यासाठी त्याठिकाणी आले असता संबंधित युवकांनी त्यांनाही लोखंडी पाइप व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली.युवकांनी हॉटेलमध्ये घुसून मारहाण व तोडफोड केल्यानंतर आरडाओरडा झाल्यामुळे परिसरातील ग्रामस्थ त्याठिकाणी धावले. ग्रामस्थांना पाहताच युवकांनी लोखंडी पाईप तेथेच टाकून पळ काढला.
Satara Crime: मराठीत बोलत नाही म्हणून हॉटेल कामगारांना मारहाण, तिघे जखमी; चौघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 12:54 IST