सातारा : जिल्ह्यात कोरोनाची आणि बळींची संख्या वाढतच आहे. गत चोवीस तासांत नवे ३६५ रुग्ण आढळून आले असून, यामध्ये चौघांचा बळी गेला. यामुळे मृतांचा आकडा १ हजार ८९७ वर पोहोचला आहे तर बाधितांची संख्या ६४ हजार १०४ इतकी झाली आहे.जिल्ह्यात गत महिनाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेषत: गत आठवड्यापासून ही संख्या आणखीनच वाढल्याचे पाहायला मिळत आहे. रोज तीनशेच्या वर बाधित येत आहेत तर अधूनमधून रुग्ण दगावत आहेत.
शनिवारी आलेल्या ३६५ जणांच्या अहवालामध्ये चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये रांजणवाडी (ता. माण) येथील ६७ वर्षीय महिला, गोरेवाडी (ता. सातारा) येथील ७५ वर्षीय पुरुष, गोळीबार मैदान सातारा येथील ८० वर्षीय पुरुष, पांढरवाडी (ता. वाई) येथील ७१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.गतवर्षी असलेले कोरोनाचे हॉटस्पॉट या वर्षीही कायम आहेत. सातारा आणि फलटण तालुक्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे या दोन तालुक्यांवर जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.फलटण तालुक्यामध्ये सर्वाधिक ९९ नवे रुग्ण तर सातारा तालुक्यामध्ये ६५ आणि कऱ्हाड तालुक्यामध्ये ६१ रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाबाधितांची संख्या चोवीस तासांमध्ये तीनशेपार होत असल्याने जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कोरोना वाढीचा वेग अत्यंत वेगाने सुरू आहे. यामुळे नेमकी परिस्थिती कशी आटोक्यात आणावी, या विवंचनेत प्रशासनाच्या सध्या बैठका आणि आढावा सुरू झाला आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि तोंडाला मास्क लावूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या ६४ हजार १०४ इतकी झाली आहे तर बळींचा आकडा १ हजार ८९७ वर पोहोचला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत ५९ हजार ३०७ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या २ हजार ९०० रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.