तळमावले : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी जाहीर करूनही तळमावले व ढेबेवाडी (ता. पाटण) परिसरात अनेकजण विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. अशा बेफिकीर ग्रामस्थांवर आता धडक कारवाई होत असून रस्त्यावर सापडेल तिथे कोरोना चाचणी केली जात आहे. कोरोना बाधित आढळल्यास दंडात्मक कारवाई करून संबंधिताला थेट कोरोना सेंटरला धाडले जात आहे.
दरम्यान, पोलिसांनी शुक्रवारपासून या कारवाईस प्रारंभ केला असून गत काही दिवसात शंभरवर ग्रामस्थांची चाचणी करण्यात आली आहे. त्यामधील चौघांचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला असून त्यांना उपचारासाठी कोरोना सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
ढेबेवाडी व तळमावले ही परिसरातील महत्त्वाची गावे आहेत. याठिकाणी दररोज हजारो ग्रामस्थांची वर्दळ असते. मात्र, कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेता सध्या शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, असे असूनही अनेकजण विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळून येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे धोरण हाती घेतले आहे. शुक्रवारपासून या मोहिमेस सुरुवात करण्यात आली असून गत तीन दिवसांत अनेक ग्रामस्थांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. केवळ दंडात्मक कारवाई न करता त्यांची कोरोना चाचणीही करण्यात येत आहे. प्रशासनाच्या या कारवाईवर सर्वसामान्यांनी समाधान व्यक्त केले असून अशीच कडक भूमिका प्रशासनाने घ्यावी. तरच विनाकारण फिरणाऱ्यांना चाप बसेल, असे मत व्यक्त केले जात आहे.
या कारवाईत सहाय्यक निरीक्षक संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कपिल आगलावे, अजय माने, नवनाथ कुंभार, संदेश लादे, होमगार्ड रोहित झेंडे, तानाजी डाकवे, विशाल मोरे, संकेत तडाखे, सणबूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. ए. डी. जाधव यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते.
- चौकट
प्रांताधिकाऱ्यांची भेट
दरम्यान, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी नुकतीच ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयातील कोरोना सेंटरची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
- कोट
रस्त्यावर विनाकारण फिरताना सापडला की थेट कोरोना चाचणी करण्यात येत आहे. अहवाल बाधित आला की कोरोना सेंटरमध्ये रवानगी होणार आहे. निष्काळजीपणे वागणाऱ्यांवर कडक कारवाई केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ढेबेवाडी विभागातील ग्रामस्थांनी विनाकारण घराबाहेर पडू नये.
- संतोष पवार
सहाय्यक निरीक्षक, ढेबेवाडी
फोटो : २५केआरडी०३
कॅप्शन : तळमावले व ढेबेवाडी येथे पोलिसांनी मोहीम राबवून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी केली.